![]()
अहिल्यानगर धावपळीच्या शहरी वातावरणात जेव्हा पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि टिपऱ्यांचा आवाज घुमला, तेव्हा सावेडीचा परिसर जणू अरण्यसंस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला. आदिवासी सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोहळ्याने अहिल्यानगरकरांना एका समृद्ध वारशाची प्रचिती दिली. प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य सांस्कृतिक मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतील आबालवृद्ध सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आलेल्या समाजबांधवांच्या एकजुटीने हा सोहळा स्मरणीय ठरला. कमाडावना नृत्य, टिपऱ्या आणि कांबड नृत्यांच्या तालावर सावेडीतील रस्ते थिरकले. निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि आपल्या हक्कांची जाणीव करून देणारा हा उत्सव केवळ देखावा नव्हता, तर संस्कृतीच्या अस्मितेचा हुंकार होता. श्रेयस लॉन येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुढील सोहळा रंगला. या वेळी विविध क्षेत्रांतील गुणवंत आणि नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. शिक्षणातूनच समाजाचा उद्धार शक्य असल्याचे सांगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिनाथ गवारी यांनी भविष्यातील आव्हानांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोले, राहाता, पाथर्डी, राहुरी, नेवासा यांसह सर्व तालुक्यांतील समाजबांधवांनी योगदान दिले. महाराष्ट्राचे प्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे यांनी आदिवासी कविता आणि निसर्ग कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांना भुरळ घातली. हक्कांचा जागर जगभरातील मूळ निवासी म्हणजेच आदिवासींच्या हक्कांचे रक्षण, संस्कृतीचे जतन आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी ९ ऑगस्टला संयुक्त राष्ट्रांर्फे हा दिन साजरा केला जातो. हा दिवस आदिवासींच्या निसर्गपूरक जीवनशैलीचा व संघर्षाचा सन्मान करणारा पर्वकाळ आहे. सावेडीत आदिवासी नृत्याचा आविष्कार पहायला मिळाला.
Source link
सावेडीत आदिवासी संस्कृतीचा अनोखा उत्सव:निसर्गाचा हुंकार ढोलगजर; टिपऱ्या-फुगड्यांच्या तालावर सांस्कृतिक जागर