Headlines

नजरा आभाळाकडे:पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर, तीन आठवड्यांपासून प्रतीक्षा; सप्टेंबरमध्येही पावसाची शक्यता कमी‎




अहिल्यानगर जिल्ह्यातील सह्याद्री घाटमाथा वगळता पर्जन्यछायेच्या भागात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू खरीप पिके अडचणीत आली असून, अनेक भागांत पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. भूजलपातळीत अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक विहिरींनी आताच तळ गाठला आहे. त्यामुळे उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. सप्टेंबरमध्येही जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असून, काही भागांत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी किंवा अन्य सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता पिकांना पाणी देणे गरजेचे असल्याचे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी सांगितले. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा २ सप्टेंबरदरम्यान नागपूर परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकतो. ३ ते ६ सप्टेंबरदरम्यान अमरावती, अकोला, जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र, अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. घाटमाथा वगळता जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये ५० मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. काही ठिकाणी १५ ते २५ मिमी पाऊस झाला तरी जमिनीतील ओलावा संपल्याने त्याचा खरीप पिकांना फारसा फायदा होणार नाही. पावसाची सरासरी फसवी जिल्ह्याची पावसाची सरासरी १०२ टक्के असली, तरी पर्जन्यछायेतील वास्तव वेगळे आहे. घाटमाथ्यावरील पावसामुळे सरासरी वाढली असून, उर्वरित भागात पावसाची तूट ४० ते ६५ टक्के आहे. ओढे-नाले मोठ्या प्रमाणावर वाहिले नसल्याने भूजलपातळीतही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे खरीप पिकांचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *