Headlines

अमरावती रुग्णालय अग्निकांड:दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासही मागेपुढे पाहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडक इशारा




अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व असह्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कडक इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अमरावती व नंतर नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रुग्णालयातील आग, फायर ऑडिटमधील त्रुटी, विरोधकांचे आरोप आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसह विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. रुग्णालय अग्निकांड: उच्चस्तरीय चौकशी सुरू रुग्णालयातील घटनेची माहिती देताना बावनकुळे म्हणाले, आग लागल्यानंतर रुग्णालयातील परिचारिका, सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धावपळ करून ३६ बालकांना सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी व्हेंटिलेटरवर असलेल्या बालकांची प्रकृती आता स्थिर असून ती नॉर्मल ऑक्सिजनवर आहेत. “घटना घडल्यापासून मी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेशी सतत संपर्कात होतो. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी एम्स (AIIMS) मधील तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि अग्निशामक अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती तपास करत आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कोणीही दोषी आढळल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.” पीडब्ल्यूडी आणि व्हेंटिलेटरची चौकशी रुग्णालयाचे फायर ऑडिट, विजेचे थेट कनेक्शन (पॉवर फ्लक्चुएशन), हाफकिनमार्फत पुरवण्यात आलेली यंत्रसामग्री व व्हेंटिलेटर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) भूमिका या सर्वांची स्वतंत्र चौकशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून सुरू करण्यात आली आहे. ९ कोटींच्या निधीचा दावा खोटा; निधीची कमतरता नव्हती विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “काही नेत्यांकडून रुग्णालयाचे 9 कोटी रुपये अडवून ठेवल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 2024-25 मध्ये 2 कोटी 73 लाख आणि 2025-26 मध्ये 3 कोटी 76 लाख रुपये केवळ फायर सिस्टिमसाठी दिले गेले होते. मग तरीही फायर सिस्टीम का कार्यान्वित झाली नाही, याचीही चौकशी होईल.” “या आर्थिक वर्षात डफरिन रुग्णालयाकडून जिल्हा नियोजन समितीकडे (DPDC) कोणताही निधी मागणीचा प्रस्ताव प्रलंबित नव्हता. रुग्णालयांमध्ये साधनसामग्री खरेदीतील दलाली रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.” रुग्णालयातील नवजात शिशु विभागाची एम्सच्या (AIIMS) मानकांनुसार अत्याधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी केली जाईल आणि आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हनुमान गढी निधी वादावर स्पष्टीकरण विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, सरकारचे बजेट विविध खात्यांमध्ये विभागलेले असते. पर्यटनाचा आणि तीर्थक्षेत्र विकासाचा निधी वेगळा असतो तर आरोग्याचा निधी वेगळा असतो. अमरावतीमध्ये हनुमान गढीच्या विकासासाठी आणि शहरात 110 कोटींचे सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यासाठी स्वतंत्र बजेटमधून तरतूद करण्यात आली असून धार्मिक स्थळांच्या विकासाचा आणि या दुर्दैवी घटनेचा संबंध जोडणे चुकीचे आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी महसूल पंधरवाडा नागपूर येथील संवादात त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (17 सप्टेंबर) महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) राज्यात विशेष महसूल पंधरवाडा राबवला जाईल. वनहक्क कायद्यांतर्गत ज्या आदिवासी शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या आहेत, त्यांना 7-इ आणि 12-इ चे अधिकार अभिलेख दिले जातील. यामुळे त्यांच्या जमिनींचा अधिकृत रेकॉर्ड तयार होईल आणि त्यांना कर्जमाफीसह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल. ज्यांचे दावे फेटाळले गेले किंवा जास्त जमिनीचे दावे कमी मंजूर झाले, त्यांच्यासाठी ग्राम व जिल्हा स्तरावरील समित्यांमार्फत पुनर्विलोकन करून न्याय दिला जाईल. पावसाची तूट आणि इतर मुद्दे विदर्भ आणि मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा 20 ते 25 टक्के पावसाची तूट राहिली आहे. परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून पुढील काळात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फलटण येथील डॉक्टरांच्या आत्महत्येची सखोल चौकशी केली जाईल; कोणाच्या दबावामुळे असा प्रकार घडला असेल तर जबाबदारांवर कडक कारवाई होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… नवरात्रीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे भगदाड?: 14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; 3 मंत्र्यांवर ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदार नवरात्रीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार, असा दावा शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य पक्षप्रवेशाची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 3 मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *