![]()
रात्रीच्या वेळी पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुकलीसोबत औषध आणि आइस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर टवाळखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “माझ्या कुटुंबाच्या दिशेने दगड का फेकता?” असा साधा जाब विचारल्याच्या रागातून तीन सराईत गुंडांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात थेट कात्री खुपसली. मुकुंदवाडी परिसरातील जयभवानीनगर भागात ३१ ऑगस्टच्या रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास हा थरार घडला. जितेश रमेश तुपशेंद्रे (३४, रा. जयभवानीनगर, गल्ली क्र. १) असे या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत रोहित ऊर्फ पिल्ल्या भाऊलाल बोराडे (२०), सचिन गणेश बोडखे (३०) आणि लक्ष्मण परमेश्वर साळुंके या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. असा घडला प्रकार जितेश कुटुंबासह जयभवानीनगरातील मेडिकलमध्ये गोळ्या घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी तिथे उभ्या असलेल्या आरोपींनी त्यांच्या कुटुंबाच्या दिशेने अचानक दगड भिरकावला. हा दगड कुटुंबाच्या जवळ पडल्याने घाबरलेल्या जितेश यांनी या टवाळखोरांना “तुम्ही दगड का फेकताय?” असा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तातडीने तपास करत रोहित आणि सचिनला अटक केली. न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर मुख्य मारेकरी लक्ष्मण याला २ सप्टेंबर रोजी बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे करत आहेत.
Source link
‘दगड का फेकला’ म्हणताच डोक्यात खुपसली थेट कात्री:संभाजीनगरच्या जयभवानीनगरातील घटना; तिन्ही आरोपी गजाआड