![]()
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख त्यांच्या आईला, मुलांना आणि आपल्याला सर्वाधिक असल्याचे सांगत, या दुर्दैवी घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा अप्रत्यक्ष रोख खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. “अजितदादांच्या जाण्याचे दुःख किती आहे, हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा अधिक कुणाला माहिती असणार? दादांची आई, दादांची मुले आणि मी..आमच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला कळणार?” अशा भावनिक शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना मांडल्या. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी आणि तपासाच्या गतीसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत. त्यांनाही पुरेसा वेळ दिला पाहिजे. सातत्याने माध्यमांसमोर येणे किंवा रोज नवी माहिती समोर येणे म्हणजेच तपास सुरू आहे, असे नाही,” असे त्या म्हणाल्या. या प्रकरणात वारंवार ‘मीडिया ट्रायल’ होत असल्याची खंतही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. तपास पूर्ण होण्यापूर्वीच निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. “दादांच्या जाण्याचे राजकारण कुणीही करू नये असे मला मनापासून वाटते,” असे त्यांनी नमूद केले. या वेळी पवार यांनी पुण्यातील विविध प्रश्नांवर देखील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मतभेद पुन्हा आले चर्चेत
सुप्रिया सुळे यांनी अपघातप्रकरणी एफआयआर आणि तपासाबाबत सरकारला प्रश्न विचारले होते. तसेच रोहित पवार यांनीही चौकशीच्या विविध मुद्द्यांवर संशय व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी प्रथमच स्पष्ट शब्दांत भूमिका मांडल्याने पवार कुटुंबातील राजकीय मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
Source link
अजितदादांच्या अपघाताचे आता राजकारण करू नका:सुनेत्रा पवारांचा सुळे, रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला