![]()
सोलापूर ते मुंबई ही बहुचर्चित विमानसेवा पुन्हा एकदा बंद झाली आहे. ‘स्टार एअर’ या कंपनीने गेल्या महिन्यात, 2 ऑगस्ट 2026 रोजी ही सेवा नव्याने सुरू केली होती. त्याआधी 28 जून 2026 रोजी ही उड्डाणे सुरू करण्यात आली होती. मात्र, आता अवघ्या महिनाभरातच ही सेवा पुन्हा स्थगित करण्यात आल्याचे कंपनीने प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे विमानसेवा पुन्हा कधी पूर्ववत होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विमानसेवा बंद करण्यामागे कंपनीने प्रामुख्याने तीन कारणे दिली आहेत. प्रवाशांचा कमी मिळणारा प्रतिसाद, सोलापूर विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ (रात्रीचे उड्डाण) सुविधेचा अभाव आणि विमानाच्या इंधनाच्या दरात झालेली मोठी वाढ, यामुळे हा निर्णय घेण्यात आला. स्टार एअरने जिल्हा प्रशासनाला ही सेवा एका महिन्यासाठी बंद करत असल्याचे कळवले असले तरी, ती पुन्हा कधी सुरू होईल याची निश्चित तारीख न दिल्याने ही सेवा सध्यातरी अनिश्चित काळासाठी बंद झाल्याचे मानले जात आहे. सोलापुरातून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी नागरिकांनी मोठी लोकचळवळ उभी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य शासनाने ‘गॅप फंडिंग’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही सेवा मार्गी लावली होती. मात्र, इंधन दरवाढीचे कारण देत स्टार एअरने केवळ सोलापूर-मुंबईच नव्हे, तर इतर काही मार्गांवरील विमानसेवादेखील तूर्तास गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. उद्घाटन आणि अल्पावधीतील बंदी सोलापूर विमानतळाचे अधिकृत उद्घाटन सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले होते, त्यानंतर विविध शहरांसाठी उड्डाणे सुरू झाली होती. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून २ ऑगस्ट रोजी मुंबईसाठी पुन्हा विमाने उडू लागली. परंतु, या प्रयत्नांना अवघ्या एका महिन्यातच पुन्हा खीळ बसली आहे. 9 सप्टेंबरच्या बैठकीकडे लक्ष या अनपेक्षित बंदीमुळे सोलापूरकरांमध्ये नाराजी असली तरी, तोडगा निघण्याची आशा अद्याप कायम आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेसंदर्भात मार्ग काढण्यासाठी येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो आणि ही विमानसेवा पुन्हा कधी सुरू होणार, याकडे आता सर्व सोलापूरकरांचे लक्ष लागून आहे.
Source link
सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा ठप्प:महिनाभरातच उड्डाणांना 'ब्रेक', प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आणि इंधन दरवाढीचा फटका