![]()
प्रामाणिक शिक्षकांच्या कार्यावरच समाज व्यवस्था टिकून आहे. शिक्षकच समाजाचा खरा दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य जयवंत मेहत्रे यांनी केले. भारत विद्यालय मिरजगाव येथे आयोजित शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यालयाचे चेअरमन डॉ. रमेश झरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मेहत्रे यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तक रुपी अमूल्य भेट दिली. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक देविदास राऊत, विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी शिक्षकांनी दिवस भरात आलेले अध्यापनाचे अनुभव व्यक्त केले. शिक्षक हा फक्त पुस्तकी ज्ञान देणारा व्यक्ती नसून जीवनाला संपूर्ण आकार देण्यासाठी मार्गदर्शक आहे, असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर खुरंगे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत विद्यालय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. माजी मुख्याध्यापक राऊत यांनी विद्यालयाच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त केले. विद्यालयाचे चेअरमन डॉ. झरकर म्हणाले, आजच्या समाजव्यवस्थेला योग्य दिशा आणि आकार देणारा एकमेव घटक म्हणजे शिक्षक होय. म्हणूनच शिक्षकांची भूमिका फक्त शाळेपुरतीच न राहता समाजाचे प्रबोधन करण्याचा भारही शिक्षकांनी घ्यायला हवा. आजच्या विद्यार्थी शिक्षकांचे त्यांच्या कामाबद्दल कौतुक करताना शाळेच्या एकंदरीत प्रगतीबद्दल ही त्यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामधून विद्यार्थ्यांनी जर आपले आयुष्य घडवले तरच शिक्षक दिन साजरा केल्याचे सार्थकी लागेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी विद्यार्थी शिक्षिका ज्ञानेश्वरी नवले हिचे त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र नवले, कल्याण गवारे, सतीश फरताडे, अन्सार तांबोळी, गौतम रसाळ, दादा शिंगाडे, विनोद देसाई, साहेबा बोडखे, वैशाली पिसे, निशा गुंड, स्नेहल ठोंबरे तसेच कर्मचारी संदीप मेरगळ, अमोल बागल, अनिल वतारे आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आदींनी विशेष परिश्रम घेतले. काही शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. काही ठिकाणी शिक्षकांची वाजतगाजत मिरवणूकही काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम आयोजित केले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शाळांचे कामकाज नेमके कशा पद्धतीने चालते याची माहिती विद्यार्थ्यांना घेता आली. अशा पद्धतीने जिल्हाभरात विविध उपक्रमांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थीच बनले शिक्षक अन् मुख्याध्यापक दरम्यान, शिक्षक दिन जिल्ह्यातील विद्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीच शाळांचे कामकाज पाहिले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक देखील विद्यार्थीच झाले होते. शाळेचे रोजचे कामकाज, विद्यार्थ्यांचे अध्यापन, दररोजच्या तासिकांचे नियोजन, परिपाठ ही सर्व कामे विद्यार्थ्यांनीच केली. विद्यार्थीच शिक्षक बनले मुख्याध्यापक बनले. शिक्षक बनून अध्यापनाचाही अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
Source link
शिक्षकच समाजाचे खरे दिशादर्शक असतात- मेहेत्रे:मिरजगाव येथील भारत विद्यालया शिक्षक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन