![]()
तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसावर यंदा संकटांची मालिका सुरूच आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कापसावर मावा, तुडतुडे आणि ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. घोसला परिसरासह तालुक्यातील अनेक भागांत कापसाची पाने पिवळी व लालसर पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चालू खरीप हंगामात सोयगाव तालुक्यात २९ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड आहे. मात्र, ऐन वाढीच्या काळात पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच यंदा पावसाने सुरुवातीला ओढ दिली. आता त्यातच मावा, तुडतुडे आणि ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कापसाच्या झाडांची पाने पिवळी व लालसर होत असून, पानांवर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी कोणती फवारणी करावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोसला परिसरातील शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून रोग-किडींचे निदान करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि कापसाला मिळालेल्या कमी दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यानंतर आता कापसावर ‘लाल्या’ रोगासह मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने पाहणी करून मार्गदर्शन करावे अशी मागणी कंकराळा येथील शेतकरी मोतीलाल हिराचंद घुसिंगे यांनी केली आहे. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी Ãजमिनीत मॅग्नेशियम किंवा इतर अन्नद्रव्यांची कमतरता असणे, पाण्याचा ताण किंवा सतत पाऊस पडल्यामुळे मुळांचे कार्य मंदावणे, मावा, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढणे यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होते. नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी मॅग्नेशियमची कमतरता असल्यास १० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. – भरत कासार, तालुका कृषी अधिकारी, सोयगाव
Source link
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज:सोयगावमध्ये कापसावर लाल्या, माव्याचे थैमान, पावसाच्या ओढीनंतर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला