![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे मागील दहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवत सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी वैजापूर शहर आणि गंगापूर तालुक्यातील किन्हळ फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी सुमारे दीड तास आंदोलन करण्यात आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वैजापूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. आंदोलनानंतर तहसीलदार सुनील सावंत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी प्रशांत पाटील सदाफळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. निवेदनात मराठा समाजासाठी केलेल्या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करावी, ५८ लाख नोंदींचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. डोणगावचे मंडळ अधिकारी शेषराव अंभोरे, ग्राम महसूल अधिकारी सुरेश ठेंगडे आणि पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात किन्हळ, देर्हळ, माळीवाडगाव, रायपूर, पिंपळगाव, दिवशी आणि पाचपीरवाडीसह पंचक्रोशीतील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिल्लेगाव ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विनोद बिघोत व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विद्यार्थ्यांच्या वाहनांना आंदोलकांनी दिला मार्ग किन्हळ फाटा येथे छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नांदगाव महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी ९.४६ वाजता रास्ता रोको सुरू करण्यात आला. हातामध्ये भगवे झेंडे आणि बॅनर घेऊन बांधवांनी महामार्गावर ठिय्या मांडला. “आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी सामाजिक भान जपत परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनांना तात्काळ मार्ग मोकळा करून दिला. दरम्यान, शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
Source link
मराठा आरक्षण:वैजापुरात दीड तास रास्ता रोको आंदोलन, संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील वाहतूक खोळंबली, मागण्यांकडे वेधले लक्ष