![]()
राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) आदेशानुसार आणि 10 सप्टेंबरच्या न्यायालयीन सुनावणीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शांतता क्षेत्रात लाऊडस्पीकरला परवानगी देता येणार नाही.त्यामुळे सध्या दिलेल्या परवानग्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचाने केली आहे.मंचाने सांगितले की, पुणे शहरात 121 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 65 शांतता क्षेत्रे आहेत. यात रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयांच्या परिसराचा समावेश आहे. फर्ग्युसन कॉलेज, एस.पी. कॉलेज, नूमवि, अशोक विद्यालय, गरवारे शाळा व महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, संचेती हॉस्पिटल आणि पुणे जिल्हा न्यायालय परिसरातील 100 मीटर क्षेत्रात लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादेबाहेर जाऊ नये. या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याची मागणीही मंचाने केली आहे. पोलिस आयुक्तांनी जाहीर केलेल्या ‘चार बेस, चार टॉप’ या ध्वनीव्यवस्थेच्या नियमावरही मंचाने आक्षेप घेतला आहे.स्पीकरची संख्या किंवा वॉटेजपेक्षा प्रत्यक्ष आवाजाची पातळी महत्त्वाची असते. आवाजाची तीव्रता वॉटेज, ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असते. त्यामुळे ‘चार बेस-चार टॉप’ हा नियम शास्त्रीयदृष्ट्या योग्य नसल्याचे मंचाने म्हटले आहे. दहीहंडीच्या वेळी 116 ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली गेल्याचे पोलिसांनी सांगितले होते. नागरिकांनी नोंदवलेल्या 60 ठिकाणांपैकी 30 ठिकाणी 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाज आढळल्याचा दावाही मंचाने केला.पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून आवाजाची पातळी मोजावी आणि कारवाई करावी, अशी मागणी मंचाने केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या ‘सण साजरा करताना आवाज कमी होणार नाही’ या भूमिकेवरही मंचाने टीका केली.ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, अशी मागणी मुकुंद किर्दत, डॉ. राहुल सावंत, चिंतामणी कांगो, डॉ. सिमी आठवले, नीता केळकर, कीर्ती लिमये यांनी केली.
Source link
एनजीटी आदेशानुसार शांतता क्षेत्रात लाऊडस्पीकरवर बंदी घाला:लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचाची मागणी