Headlines

पत्नी ठीक नसल्यास पुरुष यशस्वी होत नाही- गडकरी:मंत्री गडकरींनी सांगितला लग्नानंतरचा किस्सा




राजकारणात कितीही मोठे कर्तृत्व असले, तरी घरातून साथ नसेल तर यश मिळणे कठीणच! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या वैवाहिक जीवनातील एक भन्नाट किस्सा सांगत राजकारण, समाजकारण आणि व्यवसायातील यशामागे पत्नीची भूमिका किती महत्त्वाची असते, हे मिश्कीलपणे अधोरेखित केले. “बायको ठीक नसेल तर माणूस कितीही कर्तृत्ववान असला, तरी तो राजकारणात, समाजकारणात किंवा व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही,” असे गडकरी म्हणाले. लग्नानंतर आपल्या घरी कार्यकर्त्यांची सतत वर्दळ असायची, अशी आठवण गडकरींनी सांगितली. घरात कार्यकर्ते येत असल्याने चहापाण्याचीही मोठी लगबग असायची. एका दिवसात तब्बल शंभर-दीडशे कप चहा बनवावा लागत असे. या सततच्या पाहुणचारामुळे एकदा पत्नीने आपल्याला थेट सवाल केला. “मला बायको म्हणून आणले की मोलकरीण म्हणून?”, असा तिचा प्रश्न असल्याचे गडकरींनी सांगितले. गडकरींनी पुढे सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली. घरातील अनेक जबाबदाऱ्या पत्नी सांभाळत असते. मुलांचे संगोपन, संस्कार आणि कुटुंबाची घडी ती सांभाळते, असेही ते म्हणाले. …स्त्रीचे कर्तृत्व असते “एखाद्या पुरुषाच्या यशामागे स्त्रीचे कर्तृत्व असते,” या आशयाचे भाष्य करत गडकरींनी आपल्या अनुभवातून सार्वजनिक जीवनातील जोडीदाराच्या योगदानाकडे लक्ष वेधले. राजकारणातील भाषणांमध्ये विकासकामे, धोरणे आणि आकडेवारीवर बोलणाऱ्या गडकरींच्या या घरगुती आणि मिश्कील किश्श्याने कार्यक्रमाचा माहोलच हलका झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *