Headlines

स्मशानभूमीच्या नावावर वृक्षतोड अन् रक्कम कंत्राटदाराच्या घशात:25 झाडे निर्दयीपणे तोडली गेल्याचा प्रत्यक्षदर्शी नागरिकांचा दावा‎




शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक परिसर आणि अमरावती मार्गावरील मोठ्या झाडांची छाटणी करून त्यातून मिळणारे लाकूड स्मशानभूमीला द्यायचे ठरले असतानाही ते परस्पर कंत्राटदाराच्या घशात गेले आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार नागरिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. तसेच संबंधित यंत्रणेला तसा जाब विचारला जात आहे. गेल्या आठवडाभरापासून शहराच्या विविध भागांत झाडांच्या अतिरिक्त फांद्या कापण्याचे काम सुरू आहे. विजेच्या तारांना अडथळा होऊ नये. गणेश विसर्जनादरम्यान वाहने अडू नयेत. म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. हे करत असताना त्यातून मिळणारे लाकूड स्थानिक स्मशानभूमीला दिले जाईल, असा ठरावही नगरपालिकेने केला. परंतु प्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळेच आहे. आवश्यक छाटणीच्या नावाखाली मोठ्या झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे २५ झाडे निर्दयीपणे तोडली गेल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे. शिवाय त्यातून निघालेले लाकूड नेमके कुठे गेले, हाच प्रश्न आहे. कारण ठरल्याप्रमाणे तोडलेल्या झाडांची एकही फांदी स्मशानभूमीत पोहोचली नाही. उलट ते लाकूड थेट व्यापाऱ्याच्या घशात घालण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आतापर्यंत जवळपास आठ ते दहा ट्रक लाकूड गोळा झाले आहे. त्या लाकडांची कुठेच नोंद ठेवण्यात आली नाही. त्या लाकडांची विल्हेवाट कोणाच्या आदेशाने लावण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. झाडांची छाटणी करण्याचे नियम, पर्यावरणीय निकष आणि आवश्यक परवानग्यांचे पालन झाले का, याचीही चौकशी करण्याची मागणी चांदूरवासी करीत आहेत. दरम्यान झाडांची एकूण संख्या, छाटणीदरम्यान निघालेले लाकूड, वाहतूक आणि विल्हेवाट यांचा संपूर्ण हिशेब संबंधित अधिकाऱ्यांनी सार्वजनिक करावा, अशी मागणीही पुढे आली आहे. नगराध्यक्ष म्हणतात, चौकशी करतो झाडे वाचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर असते. परंतु प्रशासनच अशी वाट लावत असेल तर ते गंभीर आहे. त्यामुळे लाकडाची विल्हेवाट लावताना पारदर्शकता ठेवली नाही, हे शोधून काढण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. दोषी अधिकाऱ्यावर नियमानुसार कारवाईही करण्यात येईल. – प्रियंका विश्वकर्मा, नगराध्यक्ष, चांदूर रेल्वे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *