![]()
निसर्गाच्या लहरीपणाने यंदा शेतकऱ्यांची कोंडी केली .पावसाळा संपत आला तरी पुरेसा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात ४० दिवसांचा खंड पडला. त्यानंतर १० व ११ सप्टेंबरला काही भागातील पावसाने जमिनीत काहीसा ओलावा निर्माण केला होता. मात्र, गत चार दिवसांपासून उन्हामुळे तो संपत असून, सोयाबीन, कपाशीसह इतर पिके संकटात आहेत. उद्यापासून काही भागांत पाऊस ये ण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने काहीसा दिलासा मिळू शकतो. ४० दिवसांचा पावसाच्या खंडाने सोयाबीनचे उत्पादन ४० ते ५० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला. सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने काही प्रमाणात ओलावा कायम ठेवला होता; परंतु गत चार दिवसांत सर्वत्र ऊन तापत आहे. दोन दिवसांपूर्वी शहराचे तापमान ३५.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते, सोमवारी, मंगळवारीही पारा चढलेला होता. या दुपारच्या उन्हामुळे, जमिनीत ओलावा नसल्याने सध्या सर्वसाधारण स्थितीतील सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. २४ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी यंदा अनेकदा पाऊस येण्याचे अंदाज ढगातच विरल्याने पाऊस आ ल्याशिवाय काही खरे नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सप्टेंबरच्या सुरुवातीच्या पावसाने कपाशी तुरीला जीवदान दिले होते. मात्र, तापमानातील वाढ, जमिनीतील घटता ओलावा कपाशीसाठीही नुकसानकारक ठरत आहे. पाऊस आल्यास सोयाबीनच्या शेंगा भरण्यास मदत होईल.मात्र सोयाबिन मोजक्याच शेतकऱ्यांचे चांगले राहीले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जमिनीत ओलावा कमी आहे. ऊन तापत असल्याने जमिनीतील हा ओलावा वेगाने नष्ट होत आहे. परिणामी, पिकांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होऊन नुकसान होत आहे. राहूल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची दाट शक्यता निर्माण झाली. याचा फायदा विदर्भातील काही जिल्ह्यांना होणार असून, २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान अमरावती जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. डॉ. प्रवीणकुमार, शास्त्रज्ञ , नागपूर प्रादेशिक हवामान केंद्र. २४ ते २६ सप्टेंबर या दरम्यान पावसाचा अंदाज
Source link
पावसाचा 40 दिवसांचा खंड; आता उन्हाने सोयाबीन, कपाशी संकटात!:चार दिवसांपासून तापमान वाढले; निसर्गाकडून शेतकऱ्यांची कोंडी