Headlines

वडाळा येथे 3 हजार कामगारांना हक्काची घरे:वाशी एपीएमसीचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कामगार मेळाव्यात घोषणा




कष्टकरी माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित भव्य कामगार मेळाव्यात ते बोलत होते. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास केला जाईल, अशा महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, माथाडी कायदा हे कामगारांचे सुरक्षा कवच आहे. हा कायदा संपवला जाईल असा संभ्रम पसरवला जात असला तरी सरकार तो अधिक मजबूत करेल. चळवळीच्या नावाखाली कामगारांचे नुकसान करणाऱ्या खोट्या टोळ्यांवर आणि अनधिकृत प्रवृत्तींवर चाप लावण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील. वडाळा येथील गृहप्रकल्पाविषयी मुख्यमंत्री म्हणलेवकी, या प्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय व परवानग्या देण्यात आल्या आहेत. सुमारे 2,850 ते 3,000 माथाडी कामगारांना आधुनिक घरे मिळतील. तसेच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार 50 किलोपेक्षा जास्त वजनाची पोती न उचलण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण करण्यात येईल. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघाती भरपाईचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले जातील. माथाडी कामगारांच्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि आयएएस- आयपीएस अधिकारी व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ व ‘सारथी’च्या माध्यमातून उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या स्वतंत्र योजना राबवल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वाशी एपीएमसीचा आंतरराष्ट्रीय पुनर्विकास वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 50 वर्षांचा भविष्यातील व्यापार लक्षात घेऊन वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास केला जाईल. यासाठी भूगर्भातील व जमिनीवरील आवश्यक तो एफएसआय उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामुळे कामगारांना शाश्वत रोजगार मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमास मंत्री गणेश नाईक, पणन व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि हजारो माथाडी कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत माथाडी कामगारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला, तर आमदार निरंजन डावखरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश सुपूर्द केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *