![]()
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. मृत विद्यार्थी आळंदीतील विनर्स अकॅडमीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित अकॅडमी आणि आयोजकांवर असल्याचे म्हटले आहे. ‘मुलांना एवढ्या खोल पाण्यात का जाऊ दिले? याबाबत सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे महाजन यांनी स्पष्ट केले. 48 विद्यार्थी सहलीला, समुद्रात गेल्यानंतर दुर्घटना आळंदी येथील खासगी क्लासेसमधील सुमारे 48 विद्यार्थी रायगडमधील दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते. समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर काही विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी पाण्यात अडकले. या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांसोबत केवळ दोन शिक्षक असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहलीला नेताना पुरेशी देखरेख आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गिरीश महाजन म्हणाले, ‘जबाबदारी निश्चित केली जाईल’ या घटनेवर बोलताना गिरीश महाजन यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित संस्थेचीही होती. त्यामुळे मुलांना समुद्राच्या एवढ्या खोल पाण्यात जाण्याची परवानगी का देण्यात आली, याची चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही विद्यार्थी सुखरूप बाहेर आले, तर काही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे नेमकी दुर्घटना कशी घडली, त्यावेळी विद्यार्थ्यांवर देखरेख कोणाची होती आणि सुरक्षा उपाययोजना काय करण्यात आल्या होत्या, याचा तपास केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले. आळंदीत संतापाचे वातावरण या दुर्घटनेची माहिती आळंदीत पोहोचल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टडी सर्कल इमारतीबाहेर शेकडो ग्रामस्थ जमा झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी इमारतीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहल आयोजित करताना आयोजकांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित अकॅडमीच्या अधिकृततेबाबतही स्थानिकांकडून आरोप केले जात असून, या सर्व बाबींची चौकशी होणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडून चौकशी दुर्घटनेनंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना समुद्रात जाण्याची परवानगी कोणी दिली, त्या वेळी शिक्षक आणि आयोजकांची भूमिका काय होती, सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती का आणि सहलीचे नियोजन कोणत्या पद्धतीने करण्यात आले होते, याची माहिती तपासली जाणार आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदत आणि कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भविष्यात शैक्षणिक सहलींमध्ये अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मृत विद्यार्थ्यांची नावे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तन्मय दत्तात्रय वहीले, सुमित भरत अहिरे, प्रणव रामदास बनसोडे, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहीले, यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर आणि कौस्तुभ संदीप दौंड यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थी 16 वर्षांचे असून ते आळंदी, पुणे येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. हेही वाचा… दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना:सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे दिवेआगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा…
Source link
दिवेआगर समुद्र दुर्घटनेवर गिरीश महाजन संतापले:‘मुलांना एवढ्या खोल पाण्यात का जाऊ दिलं?’ सखोल चौकशीचे आदेश