Headlines

येरवडा म्हाडा पुनर्विकासाला विरोध करत रहिवाशांचे आंदोलन:महाक्लस्टर नको म्हणत म्हाडा कार्यालयासमोर घोषणाबाजी




म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला विरोध करत हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समितीच्या वतीने म्हाडाच्या इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले. हातात काळे झेंडे, नामफलक घेत महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबांनी आंदोलनात सहभाग घेत घोषणाबाजी केली. घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देतं नाय, घेतल्याशिवाय राहत नाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत रहिवाशांच्या मागण्यांचा विचार करून स्वतंत्र आणि छोट्या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समितीचे अध्यक्ष अजय बल्लाळ, म्हाडा महासंघाचे अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते, राजू बाफना, ॲड. नाना नलावडे, बाळासाहेब जानराव, राकेश मोहिते, रमेश जाधव, दिलीप म्हस्के, महेश पाटील यांच्यासह शेकडो सदनिकाधारक सहभागी झाले होते. याप्रसंगी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हाऊसिंग बोर्ड परिसरातील रहिवाशांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. हाऊसिंग बोर्ड येथील इमारती मोडकळीस आल्याची जाणीव असून, येत्या गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन या परिसरात मिनी क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यास सहमती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालणार असून, मुख्यमंत्री तसेच म्हाडाच्या उपाध्यक्षांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. लवकरात लवकर आराखडा (लेआउट) तयार करून येरवडा परिसरातील नागरिकांना न्याय देऊ, असे आश्वासन आढळराव पाटील यांनी दिले. यावेळी अजय बल्लाळ यांनी एकत्रित महाक्लस्टरला कोणत्याही परिस्थितीत विरोध असल्याचे स्पष्ट केले. दोन-तीन सोसायट्यांचे स्वतंत्र छोटे क्लस्टर करून पुनर्विकास करावा. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी म्हाडा व शासनाची असेल, असा इशारा त्यांनी दिला. ॲड. गणेश सातपुते यांनीही रहिवाशांच्या मागण्यांना पाठिंबा देत, लोकमान्यनगरला जसा न्याय मिळाला, तसाच न्याय महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाच्या नागरिकांनाही मिळालाच पाहिजे. म्हाडा जोपर्यंत येथील रहिवाशांना न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असे सांगितले. या घरात आमचं संपूर्ण आयुष्य गेलंय. आमच्या कष्टाने उभा केलेला हा संसार आहे. त्यामुळे आमच्या घराचा निर्णय आमच्याशी चर्चा न करता घेऊ नका. विकासाला आमचा विरोध नाही; पण तो आमच्या हक्काचा, आमच्या संमतीने आणि आमच्या सोयीचा असला पाहिजे. आम्हाला महाक्लस्टर नको, आमच्या सोसायट्यांचा स्वतंत्र पुनर्विकास हवा. म्हाडाने आमच्या भावनांचा आणि हक्कांचा विचार करावा. ए.आर. सोनवणे आजी( स्थानिक रहिवासी हाऊसिंग बोर्ड येरवडा)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *