Headlines

जिल्हा तहानलेलाच, यंदा पावसाळी पर्यटन कोलमडले!:प्रमुख पर्यटन स्थळांवर शुकशुकाट; स्थानिक विक्रेते, गाईड, व्यावसायिक आर्थिक संकटात‎




यंदाच्या पावसाळ्याने जिल्ह्याला अक्षरशः दगा दिला असून, अकोले तालुका वगळता संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. या लहरी पर्जन्यमानाचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि आता थेट पर्यटनावर झाला आहे. जिल्ह्याची शान असणारी पावसाळी पर्यटनाची प्रमुख ठिकाणे यंदा ओस पडली होती. किरकोळ अपवाद वगळता कुठेही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. हा केवळ निसर्गाचा लहरीपणा नसून, स्थानिकांच्या अर्थकारणावर आणि ‘वीकेंड कल्चर’वर झालेला घाव ठरला आहे. गेल्या वर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि धबधब्यांच्या परिसरामध्ये पर्यटकांच्या संख्येत ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. शनिवार आणि रविवारच्या (वीकेंड) सुट्ट्यांमध्ये होणारी आर्थिक उलाढाल यंदा अक्षरशः डाऊन झाली आहे. हॉटेल व्यावसायिक, छोटे ढाबाचालक आणि रिसॉर्ट मालकांना पर्यटकांच्या प्रतीक्षेत दिवस काढावे लागत आहेत. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी या व्यावसायिकांना त्याचा कुठलाच लाभ मिळणार नाही. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना उत्पन्नासाठी थेट पुढील मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. जिल्ह्यात यंदा ३० टक्के पावसाची तूट मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जून ते सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात पावसाची ३० टक्के तूट नोंद झाली. सरासरीपेक्षा २७० मिमी. पाऊस कमी झाला. अकोलेत समाधानकारक पावसामुळे तिथे काहीसा हिरवागार माहोल व पर्यटकांची तुरळक गर्दी दिसली. पण पावसाअभावी नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत यांसारख्या भागांतील पर्यटन स्थळांवर यंदा म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळाली नाही. परिणामी, या भागांत पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. ^ग्रामीण भागातील पावसाळी पर्यटन हे केवळ करमणुकीचे साधन नसून ते अनेक घटकांच्या उपजीविकेचा कणा आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या गाइड्स, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते, हस्तकला विक्रेते, फोटोग्राफर आणि वाहन चालकांचे अर्थकारण या सिझनवर अवलंबून असते. ग्रामीण भागातील या व्यावसायिकांचे अर्थकारण जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पर्यटकांच्या गर्दीवर अवलंबून असते. त्यांची कुटुंबेही यावरच जगत असतात. यंदा मात्र या चार महिन्यातील पावसाळी पर्यटन कोलमडल्यामुळे या दुय्यम व्यवसायांवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर वर्षभरासाठी तीव्र नकारात्मक परिणाम झाला आहे. – डॉ. बळीराम उंदरे, अर्थशास्त्र विभागप्रमुख, न्यू आर्टस कॉलेज



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *