![]()
मुंबईतील शिवाजी पार्क येथे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि ईव्हीएम विरोधात करण्यात आलेले आंदोलन पूर्णपणे फोल ठरले असून, ती केवळ एक ‘राजकीय नौटंकी’ होती, अशी टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. हे आंदोलन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीबद्दल ओतप्रोत द्वेष भरलेले षड्यंत्र होते, असा आरोपही त्यांनी केला. आंदोलनात उबाठा आणि मनसेचा सहभाग या आंदोलनाची पोलखोल करताना दरेकर म्हणाले की, “शिवाजी पार्कवरील हे आंदोलन पूर्णपणे फेल गेले आहे. या आंदोलनात जेमतेम हजार लोकांची उपस्थिती होती. ज्ञानेश कुमारांना समोर ठेवून अभिजीत दिपके आपली राजकीय नौटंकी साधण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे या मंचावर मला उबाठा गटाचे आमदार महेश सावंत आणि साईनाथ दुर्गे दिसले. त्यामुळे या आंदोलनात उबाठा आणि मनसेचा सहभाग व त्यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान यावेळी बोलताना दरेकरांनी अभिजीत दिपके यांच्या एका विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. “दिपकेंनी या मंचावरून सांगितले की, नेहरूंनी अधिकार दिले म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान ठरले. हे विधान करून त्यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान केला आहे. मी या विधानाचा जाहीर धिक्कार करतो,” असे दरेकर संतापाने म्हणाले. निवडणूक आयोग आणि ईव्हीएमबाबत दुटप्पी भूमिका विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधताना दरेकर म्हणाले की, जेव्हा विरोधक केरळ, तामिळनाडूत जिंकतात किंवा लोकसभेत राज्यातून घवघवीत यश मिळवतात, तेव्हा त्यांना तोच निवडणूक आयोग आणि त्याच ईव्हीएम मशीन्स चालतात. मात्र, इतर वेळी ते आयोगावर खापर फोडतात. तसेच, एसआरए (SRA) प्रक्रियेबाबत गैरसमज पसरवले जात असून, ती मतदार यादीतील नावे काढण्याची प्रक्रिया नसून यादी पारदर्शक करण्याचे काम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘टिनपाट लोकांनी मोदींना काम शिकवू नये’ हे आंदोलन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यासाठी रचलेले षड्यंत्र होते, असा दावा दरेकरांनी केला. पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, “जो माणूस देशासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी १८-१८ तास काम करतो, ज्यांनी स्वतःच्या आईचे निधन झाल्यावरही कार्यालयात जाऊन काम केले, अशा माणसाला दिपकेंनी काम कसे करावे हे शिकवू नये.” तसेच, संघाच्या नसानसात देशभक्ती भरलेली असून, विरोधकांच्या पोटात संघाविषयी केवळ मळमळ आणि जळजळ असल्याचेही दरेकर यांनी यावेळी ठणकावून सांगितले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करू दिले, याचेही क्रेडिट विरोधकांनी त्यांना द्यायला हवे, असा टोला त्यांनी लगावला. हेही वाचा.. ‘तुकडे-तुकडे गँग’च्या खांद्यावर हात ठेवून ठाकरेंचे मोर्चे:आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळू शकतात; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप “केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर्स या आंदोलनात फडकवले गेले. आता दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) याच ‘तुकडे-तुकडे गँग’च्या दावणीला बांधले गेले आहेत का?” असा घणाघाती सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा
Source link
अभिजीत दिपकेंचे शिवाजी पार्कवरील आंदोलन पूर्णपणे फेल:केवळ मोदी द्वेषातून रचलेली ती राजकीय नौटंकी, प्रवीण दरेकरांचा घणाघात