![]()
राहुरी तालुक्यातील खडांबे येथील श्री शाहू विद्यामंदिर विद्यालयाच्यावतीने वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक उभारण्यात आला आहे. या प्रात्यक्षिक ट्रॅकचा शुभारंभ राहुरीचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या हस्ते करण्यात आला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त जयवंत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सूरसिंगराव पवार, बाळासाहेब लटके, यशवंत ताकटे, आबासाहेब वाघमारे, प्रभाकर हरिश्चंद्रे, प्रगतशील शेतकरी संजय पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भारतीय जवान व शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणाऱ्या ‘जय जवान, जय किसान’ शिल्पाचे अनावरण करण्यात आले. पोलीस निरीक्षक गणेश वारुळे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देणारा हा राज्यातील पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण होणार आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करा. जीव वाचवण्यासाठी वेळेवर मदत मिळणे आवश्यक असते. यासाठी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्या सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार होत असून याबाबत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी जागृती होणे गरजेचे आहे. मोबाइलचा चांगला उपयोग तसेच त्याचे दुष्परिणाम याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख म्हणाले, दररोज अपघातांमध्ये अनेकांचे जीव जात आहेत. भारतीय संस्कृतीचे भान ठेवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. १०८ व ११२ क्रमांक डायल करून रुग्णवाहिका बोलवावी. समाजासाठी अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे आहेत. चांगल्या सवयी आयुष्य बदलू शकतात. परवाना मिळत नाही तोपर्यंत वाहने चालवू नका, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी वाहनात बसून घेणार वाहतुकीचे शिक्षण रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याचा उपक्रम विद्यालयाने हाती घेतला आहे. यासाठी शाळेच्या परिसरात वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक उभारण्यात आला असून या ट्रॅकवर वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाहनात बसवून रस्त्यावर दिसणारी विविध चिन्हे, वाहतूक सिग्नल, किलोमीटरचे अंतर तसेच रस्त्यालगतची गावे यांची माहिती प्रत्यक्ष कृतीद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता वाहतूक नियमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
Source link
शालेय वयामध्येच विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक नियमांचे धडे:खडांबे शाळेत उभारला राज्यातील पहिला रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक