![]()
तुषार भारतीय मित्र परिवारातर्फे १४ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या तीन दिवसीय ‘अमृत मंथन व्याख्यानमाले’च्या द्वितीय सत्रात अभिनेते व प्रभावी वक्ते राहुल सोलापूरकर यांनी ‘छत्रपती शिवरायांचे व्यापार व व्यवस्थापन शास्त्र’ यावर उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे नव्हते, तर दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक, नियोजनबद्ध व्यवस्थापक आणि व्यापाराचे महत्त्व जाणणारे राष्ट्रनिर्माते होते,’ असे प्रतिपादन राहुल सोलापूरकर यांनी केले. स्वराज्याच्या उभारणीत व्यापार, जलमार्ग, बंदरे, बाजारपेठा, महसूल व्यवस्था, संसाधनांचे नियोजन आणि मनुष्यबळाचा योग्य वापर यांना महाराजांनी दिलेले महत्त्व त्यांनी विविध ऐतिहासिक दाखल्यांच्या माध्यमातून स्पष्ट केले. शिवरायांच्या कार्यपद्धतीत ‘योग्य नियोजन, योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड, उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर,संकटाच्या काळात निर्णय घेण्याची क्षमता’ ही व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे दिसून येतात. आजच्या आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात ज्या संकल्पनांना महत्त्व दिले जाते, त्यांची प्रभावी अंमलबजावणी शिवरायांच्या राज्यकारभारात शेकडो वर्षांपूर्वी झाल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले. व्यापार हा आर्थिक व्यवहार नसून, तो राष्ट्राच्या सामर्थ्याचा महत्त्वपूर्ण आधार आहे, ही शिवरायांची भूमिका होती. समुद्रकिनारी भागातील व्यापार, आरमाराची उभारणी, व्यापाऱ्यांचे संरक्षण आणि परकीय व्यापारशक्तींशी व्यवहार करताना दाखवलेली मुत्सद्देगिरी यावरही त्यांनी प्रकाश टाकला. शिवरायांच्या व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य म्हणजे माणसांवर विश्वास ठेवणे, जबाबदारी सोपवणे आणि त्याचवेळी उत्तरदायित्व निश्चित करणे, असे सांगत त्यांनी आधुनिक काळातील संस्था, उद्योग, सामाजिक संघटनांनी शिवचरित्रातून व्यवस्थापनाचे अनेक धडे घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी राजेंद्र वानखडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे आयोजक तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे, नगरसेविका लता देशमुख यांची उपस्थिती होती. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिवादन अभिजात मराठी भाषेच्या सन्मान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र गीताने शुभारंभ केला. मराठी भाषा, तिची समृद्ध साहित्यपरंपरा, सांस्कृतिक वारसा यांना अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ने केली.राधा मोहोळ यांनी राहुल सोलापूरकर यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार नानोटी यांनी केले. छत्रपती शिवरायांची मजबूत व्यापारनीती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसोबतच मजबूत व्यापार धोरणालाही महत्त्व दिले. त्यामुळे हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच नव्हे तर इतरही किल्ल्यांवर बाजारपेठा, व्यापारी पेढ्या होत्या. मजबूत व्यापार धोरणाशिवाय आर्थिक उत्कर्ष व आर्थिक नियोजन शक्य नाही, असे महाराजांचे स्पष्ट मत होते. यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांना विशेष सवलतीही दिल्याचे काही दाखले आढळतात.
Source link
छत्रपती शिवरायांचे व्यापार व्यवस्थापन; आधुनिक युगाला दिशा- सोलापूरकर:शिवकालीन व्यापारनिती, नियोजन, व्यवस्थापनावर विवेचन