![]()
ऊस दराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करू नये. सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास ‘काटा बंद’ आंदोलन छेडण्यात येईल. तसेच अजिंक्यतारा सुरू झाल्यास जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू होऊ देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. राजू शेट्टी यांनी अजिंक्यतारा साखर कारखान्याला भेट देत प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भूमिका मांडली. ऊस दर निश्चित झाल्याशिवाय कारखान्यांनी गाळप सुरू करणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ऊस दराबाबत ठोस निर्णय झाल्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. इथेनॉलचा दर 70 रुपये करण्याची मागणी इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर 70 रुपये करावा, तसेच साखरेची किमान विक्री किंमत अर्थात एमएसपी वाढवावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. पेट्रोलच्या दरात वाढ होत असताना इथेनॉलच्या दरात मात्र अपेक्षित वाढ केली जात नाही. दुसरीकडे साखरेची एमएसपी अनेक वर्षांपासून स्थिर आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तसेच साखर कारखान्यांवर आर्थिक दबाव निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. इथेनॉल निर्मिती आणि साखरेच्या दराबाबत केंद्र सरकारने शेतकरी आणि कारखान्यांच्या आर्थिक हिताचा विचार करणे गरजेचे आहे. उत्पादन खर्च वाढत असताना जुन्या दरांवर ऊस व साखर उद्योग चालविणे शक्य नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून कारखाने सुरू करण्यासाठी दबाव? केंद्र सरकारकडून साखर कारखाने लवकर सुरू करण्यासाठी कारखानदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढू नयेत आणि बाजारात नवीन साखर उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारची कारखाने लवकर सुरू करण्याची घाई सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ‘शेतकरी आणि कारखानदारांनी तोटा सहन करायचा आणि केंद्र सरकारने बाजारासाठी साखर उपलब्ध करून घ्यायची, हे मान्य करता येणार नाही,’ अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. साखर उद्योगातील निर्णय घेताना केवळ बाजारातील साखरेची उपलब्धता न पाहता शेतकरी आणि कारखानदारांच्या आर्थिक स्थितीचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. घाईने ऊस तोडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान गळीत हंगाम लवकर सुरू केल्यास ऊसाची रिकव्हरी कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच ऊसाचे वजनही अपेक्षेप्रमाणे मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना एकरी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे ऊसाची रिकव्हरी आणि वजन वाढल्यानंतरच गाळप सुरू करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांनीही केवळ कारखाना सुरू झाला म्हणून कमी प्रतीचा किंवा अपुरा वाढलेला ऊस घाईने तोडून कारखान्याला देऊ नये. ऊसाची योग्य वाढ आणि साखरेचे प्रमाण वाढल्यानंतरच तोडणी करावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. 12 ऑक्टोबरला दिल्लीत बैठक दरम्यान, ऊस दर आणि साखर उद्योगातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे केंद्रातील संबंधित मंत्र्यांसोबत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. ऊस दराच्या प्रश्नावर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘अजिंक्यतारा’बाबत निर्णय संचालक मंडळ घेणार अजिंक्यतारा साखर कारखाना सध्या बंद असून गळीत हंगाम सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजी मोहिते यांनी दिली. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न, केंद्र सरकारची भूमिका आणि आगामी बैठकीतील निर्णय याकडे आता ऊस उत्पादक शेतकरी तसेच साखर कारखान्यांचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम कधी सुरू होणार आणि ऊस दराबाबत काय तोडगा निघणार, याबाबतची पुढील भूमिका 12 ऑक्टोबरच्या दिल्ली बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हेही वाचा…. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री:‘तुमच्या रागात सहभागी होण्यासाठी आलोय’, 70 हजार पदभरतीवरून सरकारला इशारा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसह सरकारी पदभरतीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी सरकारच्या भरती प्रक्रियेवर, बेरोजगारीवर आणि खासगीकरणाच्या धोरणावर जोरदार टीका केली. “मी भाषण करायला नाही, तुमच्या रागात सामील व्हायला आलोय,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सविस्तर वाचा….
Source link
ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत ‘काटा बंद’:‘अजिंक्यतारा’ सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा थेट इशारा