![]()
लासूर स्टेशन पंचक्रोशीतील सर्वात मोठ्या रविवारच्या आठवडी बाजारामुळे परिसरात मोठी गर्दी होत आहे. सुमारे ५० गावांतील नागरिक व शेतकरी बाजारासाठी येत असल्याने रेल्वे गेटवर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. रविवारी रेल्वे ये-जा करण्याच्या वेळी गेट बंद होताच दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या रेल्वे दुहेरीकरणासह उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच गेट बंद झाल्यानंतर लवकर जाण्याच्या प्रयत्नात काही दुचाकीस्वार राँग साइडने मार्ग काढतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी अधिकच वाढते. प्रसंगी वाहनधारकांमध्ये वादाचे प्रकारही घडत आहेत. या रेल्वे गेटलगतच लासूर बाजार समितीची मोठी अडत व धान्य बाजारपेठ असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचीही मोठी वर्दळ असते. व्यापाऱ्यांना बँक व्यवहारासाठी गावात ये-जा करावी लागत असल्याने रेल्वे गेटवरील कोंडी त्यांच्यासाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिल्लेगाव पोलिस व रेल्वे प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन करावे, तसेच रेल्वे लासूर व उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारक, शेतकरी व व्यापाऱ्यांकडून होत आहे.
Source link
रविवारच्या आठवडी बाजारामुळे लासूर रेल्वे गेटवर वाहतूक कोंडी; प्रवासी त्रस्त:रेल्वे दुहेरीकरण, उड्डाणपुलाच्या कामाचा परिणाम; वाहतूक नियोजनाची मागणी