![]()
गावात अवैधरीत्या सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे सातत्याने भांडणे, वादविवाद आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याने अखेर वरखेड ग्रामस्थांनी एकजूट दाखवत अवैध दारूविक्रीविरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील एका तरुणाचा भांडणातून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून गावातील सर्व अवैध दारूविक्रीची दुकाने बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यासाठी आज वरखेड येथील मारुती मंदिर परिसरात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांनी विशेष पुढाकार घेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अवैध दारूविक्रीमुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून दारूच्या नशेत होणाऱ्या छोट्या-मोठ्या भांडणांचे रूपांतर गंभीर घटनांमध्ये होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, बैठकीला उपस्थित न राहिलेल्या काही दारूविक्रेत्यांच्या घरीही ग्रामस्थांनी एकत्रितपणे पदयात्रा काढली. गांधीगिरीच्या माध्यमातून संबंधितांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यापुढे गावात दारू विक्री न करण्याचे आवाहन व इशारा देण्यात आला. या बैठकीस पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे, दिलीप वाघ, भीमा उबाळे, भारत वाघ, रंजित वाघ, सोमनाथ शिंदे, गणेश वाघ, साईराम राऊत, शांतवन उबाळे, पंढरीनाथ जानराव, सागर उबाळे, अनिल उबाळे उपस्थित होते. कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांत नाराजी शेतकरी नेते वाल्मीक शिरसाठ यांनी पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती असतानाही त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने अवैध दारूविक्रीवर कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Source link
निर्धार:अवैध दारू विक्रीविरोधात वरखेडच्या ग्रामस्थांचा एल्गार; महिलांचा पुढाकार