Headlines

सहा दिवस उलटले; सोयगाव तालुक्यात 24,669 हेक्टरचे पंचनामे अद्याप बाकी:10 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे तालुका कृषी विभागाचे आश्वासन‎




तालुक्यातील दुष्काळग्रस्त चारही महसूल मंडळांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना आता गती आली आहे. मात्र, तालुक्यातील ८७ महसुली गावांमधील एकूण ४२ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे पूर्ण झाले असून अद्याप २४ हजार ६६९ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे बाकी आहेत. उर्वरित पंचनामे कधी पूर्ण होणार याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय २५ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला. त्यानुसार तालुक्यातील दुष्काळग्रस्त ८७ गावांमध्ये खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून गावागावांत ही कार्यवाही सुरू असून उर्वरित क्षेत्रातील पंचनामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून गती देण्यात येत आहे. ४२,६६९ हेक्टरचा अहवाल कधी तयार होणार? ८७ गावांमधील पीक पंचनामे पूर्ण झाल्यानंतर महसूल विभागामार्फत नुकसानीचा अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवल्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईची मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण होण्यास होणाऱ्या विलंबाचा थेट परिणाम मदत मिळण्याच्या प्रक्रियेवर होणार असल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे. उर्वरित पंचनाम्यांना आणखी वेग देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पंचनाम्यांची कार्यवाही शीघ्रगतीने सुरू तालुक्यात पीक पंचनाम्यांची कार्यवाही शीघ्रगतीने सुरू असून, येत्या १० ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण होतील. यासाठी शेतकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करून आपल्या क्षेत्रातील पंचनामे करून घ्यावेत. त्यानंतर पीक पंचनाम्यांचा अहवाल तयार करून कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्याची कार्यवाही केली जाईल. -भारत कासार,कृषी अधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *