![]()
शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाइपलाइन टाकताना जे रस्ते खोदले आहेत, त्यांचे पॅचवर्क सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईत सोमवारी (५ ऑक्टोबर) आयोजित शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरातील अंतर्गत पाइपलाइनचे काम गतीने पूर्ण करून नागरिकांना नळ कनेक्शन देण्यास तातडीने सुरुवात करावी, तसेच उर्वरित जलकुंभांची कामे वेगाने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. संबंधित यंत्रणांनी कंत्राटदारांकडून केवळ वरवरचे काम करून न घेता निर्धारित उद्दिष्ट वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. राज्य शासनाकडून ८५ ते ९० कोटींच्या निधीची अपेक्षा शहरात जलवाहिनीसाठी रस्ते खोदल्यानंतर त्यांच्या पॅचवर्कसाठी सुमारे १०० कोटींची आवश्यकता आहे. नियमानुसार हे पॅचवर्कचे काम संबंधित ठेकेदाराने करणे अपेक्षित होते. मात्र, “आमच्या करारातील पॅचवर्कचा कोटा संपला आहे,” असे सांगत ठेकेदाराने हात वर केले होते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. या समस्येवर ‘दिव्य मराठीने “शहरातील ११०० कोटींचे रस्ते खड्ड्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे डोळे उघडले होते. या वृत्तानंतर सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाने अत्यंत अपुरा म्हणजेच १ कोटींचा निधी देऊन तुरळक काम सुरू केले होते. प्रत्यक्षात शहरात रस्ते पूर्ववत करण्यासाठी ८५ ते ९० कोटींचा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे. हा पैसा नेमका कुणी द्यायचा, यावरून मनपा आणि मजीप्रा यांच्यात बोट दाखवण्याचा खेळ सुरू होता. मनपा मजीप्राकडे तर मजीप्रा मनपाकडे बोट दाखवत होते. आता मुख्यमंत्र्यांनीच रस्ते बुजवून पॅचवर्कचे आदेश दिले. हंडा मोर्चाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात ऑक्टोबर महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. विशेषतः शहरातील नो नेटवर्क भागात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असून तीव्र आंदोलने पेटू लागली आहेत. रविवारी सातारा-देवळाई परिसरात नागरिकांनी पाण्यासाठी मोठे आंदोलन केले. उल्लेखनीय म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी याच पाणी प्रश्नावर ऐतिहासिक हंडा मोर्चा काढला होता. आता तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि राजकीय कोंडी टळावी, यासाठीच मुख्यमंत्री स्वतः या योजनेचा थेट आढावा घेत असून, नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्याची स्थिती
अंतर्गत जलवाहिनी : एकूण १९०० किमीपैकी १२०० किमीचे काम पूर्ण.
जलकुंभ व संप : एकूण ५३ जलकुंभ व २ संप; यापैकी ६ टाक्या पालिकेकडे हस्तांतरित, तर १८ टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात.
जलशुद्धीकरण केंद्र : काम जवळपास पूर्ण; दैनंदिन २०० एमएलडी पाणी शुद्धीकरणाची क्षमता तयार. जॅकवेल :जॅकवेलचे काम पूर्ण; २ पंप बसवले असून उर्वरित पंप बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू.
मुख्य जलवाहिनी : मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण.
Source link
रस्त्यांचे पॅचवर्क सुरू करा, प्रत्येक घराला नळ जोडणी द्या: CM:पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत काम रखडवणाऱ्या कंत्राटदारांना ‘ब्लॅकलिस्ट’चा इशारा