![]()
मुंबईतील आयआयटी पवई कॅम्पसमध्ये गुरुवारी मध्यरात्री एका भीषण दुर्घटनेने मोठी खळबळ उडाली. कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक 6 मध्ये सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती होऊन अचानक मोठा भडका उडाला. या आगीत दोन लहान मुलांसह एकूण 5 जण होरपळले आहेत. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून, सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्रीचा थरार आणि बचावकार्य मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री वसतिगृहाच्या परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ असताना अचानक सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती सुरू झाली. काही कळण्याच्या आतच तिथे आग लागली आणि आगीचा भीषण भडका उडाला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले व आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश या आगीच्या भडक्यात एकूण 5 जण भाजले गेले आहेत, ज्यामध्ये 9 आणि 12 वर्षांच्या दोन बालकांचाही समावेश आहे. अंश अहिरवार, तहजीब आलम, शिवकुमार सिंग आणि अनिलकुमार यादव अशी चार जखमींची नावे असून, त्यांच्यावर घटनास्थळी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, ईश्वर सिंग नावाच्या आणखी एका जखमी व्यक्तीवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर सुदैवाने, पालिका आणि पोलिसांनी वेळेवर मदत पोहोचवल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आणि स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी आणि प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, याबाबत पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास केला जात आहे.
———— ही बातमी पण वाचा.. मुलुंड पूर्वेत कामगारांच्या संक्रमण शिबिराला भीषण आग: 7 ते 8 सिलिंडरचे स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली मुलुंड पूर्वेकडील नवघर परिसरात बांधकाम कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या संक्रमण शिबिराला गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीदरम्यान एका सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर शिबिरातील इतर सिलिंडरही स्फोट होऊन आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व कामगारांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
मुंबईतील IIT पवई कॅम्पसमध्ये मध्यरात्री थरार:सिलिंडर गळतीने अचानक भडका, दोन चिमुकल्यांसह 5 जण होरपळले