![]()
विदर्भातील प्रमुख शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा पोल्ट्री (कुक्कुटपालन) व्यवसाय सध्या तीव्र दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, खाद्याचे वाढलेले दर व बाजारपेठेतील मंदीमुळे अस्तित्वाच्या लढाईत सापडला आहे. पावसाअभावी सोयाबीन-कापूस पिकांचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील पैशांचे रोटेशन थांबले आहे. खरेदी क्षमता घटल्याने चिकनची विक्री ५० ते ६० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. अकोला येथील ‘इंडिया पोल्ट्री ट्रेड’च्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात मजुरांना काम नसल्याने बाजारातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. गणेशोत्सवानंतर लिलावाचे दर १३६ रुपये प्रति किलोवर गेले आहेत. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणीत पुन्हा मोठी घट होण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत सध्या शेतकऱ्यांच्या शेडमधून पक्षी उचलण्याचा लिलाव दर प्रति किलो १३६ रुपये आहे. किरकोळ चिकन विक्रेते ग्राहकांना २८० रुपये प्रति किलोने विक्री करत आहेत. सर्व प्रकारची हवामानविषयक जोखीम आणि मृत्यूची जोखीम शेतकरी व कंत्राटी कंपन्या उचलत आहेत. कोणताही मोठा धोका न पत्करता मध्यस्थ व किरकोळ व्यापारी निश्चित नफा कमावत आहेत. हे वास्तव कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेतून समोर आले आहे. ^ पोल्ट्री उद्योगात बहुतांश काम हे मोठ्या कंपन्यांच्या कंत्राटी (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) पद्धतीवर चालते. कंपन्यांना पक्षांचा उत्पादन खर्च प्रति किलो सुमारे १०५ रुपये येत असताना, गेल्या दोन महिन्यांत बाजारात ६५ ते ७० रुपये दराने पक्षी विकावे लागले. यामुळे कंपन्यांना प्रति किलो ३० ते ३५ रुपयांचा थेट तोटा सहन करावा लागला. या प्रचंड नुकसानीमुळे कंपन्यांनी दोन ते अडीच महिने शेतकऱ्यांच्या शेडमध्ये नवीन पक्षी टाकणेच बंद (बॅच हॉलिडे) ठेवले, असे मूर्तिजापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक विकी राऊत यांनी सांगितले. – विकी राऊत , पोल्ट्री व्यावसायिक, विराहित. मूर्तिजापूर तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय अधिक ^जिल्ह्यात १० मोठे कुक्कुटपालन व्यवसाय पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणीकृती आहेत. त्यातही मूर्तिजापूर तालुक्यात पोल्ट्री व्यवसायाची संख्या अधिक आहे. तेथे पोल्ट्री क्लस्टर तयार झाले आहे. जिल्ह्यातील तरुणांनी शेतीपूरक असलेला पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यास त्यातून चांगले अर्थार्जनाची संधी आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान मिळते.- डॉ. गजानन गवई, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, अकोला.
Source link
पोल्ट्रीला फटका; ब्रॉयलरला शेडमध्ये 136 तर दुकानात 280 रुपयांचा दर:बाजारात मंदी, विक्री 50 टक्क्यांनी घटली; पाण्याची टंचाई अन् खर्चात वाढ