![]()
“पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले असून प्रचाराची जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीमधील कोणत्याही घटक पक्षाचा किंवा संघटनेचा या निवडणुकीवर कोणताही बहिष्कार राहणार नाही. ’10 हजार 500 शिक्षकांचा मतदानावर बहिष्कार आहे’, असा दावा केला जात असला तरी त्या शिक्षकांनी काय त्यांना तसे लिहून दिले आहे का? महायुतीत वरिष्ठ पातळीवर उत्तम समन्वय असून सर्व घटकांशी संवाद साधून लवकरच यावर मार्ग काढला जाईल,” असा ठाम विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर येथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीनिमित्त भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयकुमार गोरे यांनी निवडणुकीची रणनीती, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा दावा, उमेदवारांचे आगामी दौरे आणि बहुप्रतीक्षित उजनी पर्यटन प्रकल्पाच्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. बूथ आणि मंडळ स्तरावर जबाबदाऱ्यांचे वाटप; निवडणुकीची पहिली फळी सज्ज सोलापुरात पार पडलेल्या भाजपच्या बैठकीबाबत माहिती देताना मंत्री गोरे म्हणाले, “पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजप तथा महायुतीची तयारी वेगाने सुरू आहे. आजच्या बैठकीत बूथ आणि मंडळ स्तरावर पक्ष कार्यकर्त्यांवर ठोस जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांची पडताळणी, सुशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचणे आणि पहिल्या टप्प्यातील प्रचाराचे अचूक नियोजन करणे यावर सखोल चर्चा झाली. महायुतीचे उमेदवार हे सक्षम आणि अनुभवी असून संपूर्ण पाच जिल्ह्यांमध्ये महायुतीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करण्यासाठी पक्षाची यंत्रणा आता पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहे.” शिक्षकांनी लिहून दिलेय का?; बहिष्काराचा प्रश्नच उद्भवत नाही महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक संघटनेने 10 हजार 500 शिक्षकांच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या दाव्यावर विचारले असता जयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “त्यांनी नेमका काय निर्णय घेतला आहे आणि तो कोणी जाहीर केला आहे, हे तपासावे लागेल. त्या १० हजार शिक्षकांनी काय यांच्याकडे तसे लिहून दिले आहे का? असा कुठलाही बहिष्कार प्रत्यक्ष मतदानात दिसणार नाही.” वरिष्ठ पातळीवरून मार्ग निघेल “महायुतीमधील तिन्ही पक्ष आणि त्यांच्याशी संलग्न संघटना यांच्यात सतत संवाद सुरू आहे. महायुतीत कुठलाही मिठाचा खडा पडणार नाही. वरिष्ठ नेते यावर चर्चा करून तात्काळ तोडगा काढतील आणि सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात सक्रिय राहतील.” सोलापुरात 16 आणि 18 तारखेला उमेदवार दाखल होणार! उमेदवार अद्याप सोलापूर दौऱ्यावर का आले नाहीत, या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना त्यांनी मतदारसंघाच्या व्याप्तीची जाणीव करून दिली. “हा मतदारसंघ पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा पाच मोठ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांचे नियोजनबद्ध दौरे आखण्यात आले आहेत. उमेदवार पहिल्या टप्प्यात येत्या १६ तारखेला आणि त्यानंतर १८ तारखेला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यांमध्ये विविध शिक्षक संघटना, पदवीधर तरुण आणि संस्थाचालकांशी ते थेट संवाद साधणार असून त्यानंतरही नियमित दौरे सुरू राहतील.” उजनी धरण पर्यटन प्रकल्पाला जलसंपदा विभागाची मंजुरी सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या उजनी पर्यटन विकासाबाबत बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी दिलासादायक बातमी दिली. “उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव आता अधिकृतरीत्या मंजूर झाला आहे. जलसंपदा विभागानेही या प्रकल्पाच्या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यामुळे आता केवळ कागदावर चर्चा न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उजनी पर्यटन प्रकल्पाच्या कामाला लवकरच गती दिली जाईल आणि सोलापूरच्या पर्यटनाला नवे वैभव प्राप्त होईल,” असे जयकुमार गोरे यांनी शेवटी नमूद केले. —————————————————————- हेही वाचा… एकनाथ शिंदे नाराज नाहीत: विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या 2 बैठकांच्या गैरहजेरीवर उदय सामंतांचा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहिल्यामुळे ते महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात मोठे उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा असून, उपमुख्यमंत्री कोणत्याही कारणास्तव नाराज नसल्याचा स्पष्ट खुलासा राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी केला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, म्हणजेच ‘नंदनवन’ येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांची रणनीती आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
महायुतीत कसलाही बहिष्कार चालणार नाही, तोडगा निघेल!:10 हजार शिक्षकांनी त्यांना लिहून दिलंय का? पदवीधर-शिक्षक निवडणुकीवर मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल