![]()
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांची आर्थिक लूट करू नये; अन्यथा संबंधित व्यापाऱ्यांचा खरेदी-विक्री परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी मतदारसंघातील संचालक अब्दुल जावेद सेठ यांनी दिला. गुरुवारी बाजार समितीत आयोजित व्यापाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या तक्रारींची दखल घेत बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी संचालक जावेद म्हणाले की, दुष्काळात शेतकऱ्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत टोमॅटोचे पीक सांभाळले आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये आणि शेतमाल खरेदी केल्यानंतर देय असलेली रक्कम त्वरित अदा करावी. पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीकडे तक्रार करावी. यावेळी बाजार समितीचे संचालक प्रकाश अग्रवाल म्हणाले की, केवळ वैध परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच नियमानुसार शेतमालाची खरेदी करता येईल. परवानाधारकांनी बाजार समितीने निश्चित केलेल्या आवारातच खरेदी-विक्री करावी. या बैठकीत व्यापारी रामदास शिरसे, अविनाश जाधव, रामकृष्ण दाबके, रवींद्र राठोड, युवराज राठोड, सलीम शेख, संतोष जाधव, रमेश खरात, अजहर बागवान, मुश्ताक शहा, प्रकाश आळीन, अमित पवार, फाईन शेख, प्रदीप जाधव, राहुल गोरे, संतोष देसाई, रवींद्र जाधव, अमोल बनकर, रफिक शेख, अमोल जाधव, सतीश अधिक, राहुल पवार व चंद्रकांत पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने, गोकुळ राठोड, सहायक सचिव बाळू पवार, पवन पवार, निलेश पवार, प्रथम जाधव, महेश आल्हाड व संजय पवार यांची उपस्थिती होती. आभार सागर बागुल यांनी मानले. यावेळी व्यापारी उपस्थित होते. देवगाव रंगारी, कन्नड केंद्रांवर दररोज ३० हजार टोमॅटो क्रेट खरेदी ः सभापती सभापती डॉ. मनोज राठोड यांनी सांगितले की, शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून व्यापाऱ्यांनी मालाचे पैसे रोखीने अदा करावेत. आर्थिक शिस्तीमुळे बाजार समिती गेल्या चार वर्षांपासून नफ्यात असून ४ कोटींची उलाढाल झाली आहे; तसेच १० लाख रुपये नफा मिळवून समिती ब वर्गातून अ वर्गात आली आहे. प्रास्ताविक करताना सचिव कुणाल कदम यांनी सांगितले की, देवगाव रंगारी व कन्नड येथील खरेदी केंद्रांवर दररोज ३० हजार टोमॅटो क्रेट खरेदी होत असून ३०० ते ३५० रुपये प्रतिक्रेट भाव मिळत आहे. यावेळी बाजार समितीमधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यास खरेदी-विक्री परवाना रद्द करणार:संचालक अब्दुल जावेद यांनी दिल्या व्यापाऱ्यांना सूचना