![]()
नागपूर येथून हिंगोलीकडे निघालेल्या तरुणाला आरक्षीत डब्यात बसल्याच्या कारणावरून रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोषी पोलिसावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आबंडेकर अनुयायी यांनी गुरुवारी ता. 22 पहाटे भगत कि कोठी ते काचीगुडा हि रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकावर अडीच तास रेल्वे रोखून धरली. रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तक्रार घेण्यात आली. त्यानंतर सकाळी पावने आठ वाजता रेल्वे मार्गस्थ झाली. हिंगोली जिल्हयातील मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी नागपुर येथे दिक्षाभुमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्या ठिकाणी कार्यक्रम आटोपून परतीच्या मार्गावर होते. यावेळी भगत कि कोठी ते काचीगुडा या रेल्वेमध्ये काही अनुयायी बसले होते. वाशीम येथून हि रेल्वे हिंगोलीकडे निघाल्याने सुरज वाव्हळे व सागर वाव्हळे हे दोघे बोगी क्रमांक एक या आरक्षीत डब्यात बसले. यावेळी रेल्वे पोलिसचे कर्मचारी त्या डब्यात आले त्यांनी सुरज वाव्हळे यांना शिवीगाळ करून मारहाण सुरु केली. मात्र रेल्वे निघाल्यामुळे धावत डब्यात बसलो असे सांगत असतांनाही पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. दरम्यान, सदर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर इतर डब्यातील आंबेडकर आनुयायी यांनी आरक्षीत बोगीकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांची समजून घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ऐकले नाही.त्यानंतर सुरज यांचे नातेवाईक गौतम सरवदे (रा. आंबाजोगाई) यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधून मदत मागितली. त्यांना हिंगोली रेल्वे स्थानकावर मदत दिली मिळेत असे सांगण्यात आले. दरम्यान, सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे हिंगोली रेल्वेस्थानकावर आल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी रेल्वे रोखून धरली. जोपर्यंत दोषी रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत रेल्वे जाऊ देणार नाही अशी भुमीका त्यांनी घेतली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, उपाधिक्षक देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, सुनील अंभोरे, संजय तोडेवाले, रेल्वे पोलिस कर्मचारी अंकुश बांगर, इंगोले, यांच्यासह पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेतली. यावेळी पोलिसांनी संवाद साधून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर गौतम सरवदे यांची तक्रारी घेण्यात आली. त्यानंतर अडीच तासानंतर पावने आठ वाजण्याच्या सुमारास रेल्वे नांदेडकडे मार्गस्थ झाली. जखमी सुरज यांच्यावर हिंगोलीत उपचार सुरू या प्रकरणात जखंमी सुरज वाव्हळे यांच्यावर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Source link
रेल्वेत तरुणाला मारहाण प्रकरण:प्रवाशांनी हिंगोली स्थानकावर अडीच तास रेल्वे रोखली, रेल्वे पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी