Headlines

नागपुरात हिट अँड रन, वृद्ध महिलेचा मृत्यू:मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडले




नागपूर शहरातील गजबजलेल्या धरमपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास एका भीषण हिट अँड रनची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. ही दुर्घटना धरमपेठेतील सुगंध मंगल कार्यालयाजवळील चौकात घडली. मंगला केवटे (अंदाजे ७० वर्षे) या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी अतिवेगाने आलेल्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्या रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने क्षणाचाही विलंब न करता वाहनासह पळ काढला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार राज्याबाहेरील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कारचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, अशा बेफाम वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागपूर शहरातील फुटपाथवर वाढलेले अतिक्रमण हा देखील या घटनेमागील गंभीर मुद्दा असल्याचे नागरिकांनी अधोरेखित केले. “वृद्धांनी चालायचं तरी कुठून?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, भंडारा येथेही एका वेगळ्या घटनेत एसटी बस रिव्हर्स घेताना दुचाकीवरील बापलेकाला चिरडून दोघांचा मृत्यू झाला. रोहित खेडकर (३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा पुतण्या अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एसटी आगारात आंदोलन केले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *