“राजकारणात कोणत्याही पक्षाचा नेता असो, संसदीय आणि सुसंस्कृत भाषेची मर्यादा कधीही ओलांडली जाऊ नये. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून नकळत चूक झाली असेल, ते त्याबाबत नक्कीच पक्षाची भूमिका स्पष्ट करतील. मात्र, त्याच वेळी भाजपचे नेते आणि कें
.
गुजरात मधील पंचमहाल येथे आयोजित जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी खरगे यांच्या विधानावर पक्षाची भूमिका स्पष्ट करतानाच, वाजपेयींच्या काळातील संसदेतील सुसंस्कृत राजकारण, प्रसारमाध्यम व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा, चीनचे लडाख व अरुणाचलमधील अतिक्रमण आणि केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर सविस्तर भाष्य केले.
खरगे स्पष्टीकरण देतील, पण अमित शहांनी काय म्हटले होते? -पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, “कोणत्याही राजकीय पातळीवर बोलताना भाषेची मर्यादा सोडली जाऊ नये. खरगे यांच्याकडून नकळत चूक झाली असून, ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व अत्यंत ज्येष्ठ नेते असल्याने स्वतः यावर स्पष्टीकरण देतील.”

भाजपला आरसा दाखवला
“केवळ एका बाजूने टीका करणे चुकीचे आहे. अमित शहा यांनी राहुल गांधींविषयी वापरलेले शब्द किंवा पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधींबद्दल वापरलेली असंसदीय भाषा सत्ताधाऱ्यांना चालते का? दोन्ही बाजूंनी चुका झाल्या असून अमित शहांनीही तसे बोलायला नको होते आणि पंतप्रधानांनीही मर्यादा सोडायला नको होती.”
वाजपेयींच्या काळातील सुसंस्कृतपणा संपला
“मी खासदार असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाहिले आहे. त्या काळात सभागृहात अरुण जेटली, सुषमा स्वराज, जसवंत सिंग यांच्याशी आम्ही अत्यंत आक्रमकपणे वाद घालायचो, एकमेकांवर तुटून पडायचो. परंतु सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्यावर हात ठेवून एकत्र चहा प्यायचो. आज मात्र दुर्दैवाने राजकीय विरोधकांना थेट ‘जानी दुष्मन’ मानले जात आहे, ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती आहे.”
डॉक्युमेंट्रीवर बंदी आणि न्यायालयांचे आदेश; देशात दमनकारी नीती सुरू
देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलताना त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयातील एका ताज्या प्रकरणाचा हवाला दिला. “एका अनिवासी भारतीयाने (NRI) देशातील बड्या उद्योगपतींवर आणि सरकार चालवणाऱ्या मोजक्या लोकांवर एक डॉक्युमेंटरी बनवली होती. परंतु ती रोखण्यासाठी थेट कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. गुजरात, दिल्ली किंवा मुंबई सोडून कोलकात्यात का गेले, हे सर्व कायदेतज्ज्ञ जाणतात.”
इंटरनेटवरून सर्व हटवण्याचे फर्मान
“त्या डॉक्युमेंटरीचा 1 सेकंदाचाही भाग किंवा रील इंटरनेटवर, युट्यूबवर दिसता कामा नये, अन्यथा कारवाई होईल असा आदेश देण्यात आला. लोकशाहीत नागरिकांचे आणि पत्रकारांचे आवाज दडपण्याचे हे दमनकारी धोरण असून देशात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न पडतो.”
चीन लडाख आणि अरुणाचलमध्ये घुसला, तरी पंतप्रधान मूग गिळून का बसलेत?
देशाच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “भारताची आर्थिक स्थिती आणि आंतरराष्ट्रीय पत ढासळत चालली आहे. चीनने संपूर्ण अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील भारतीय जमिनीवर कब्जा करून बसला आहे. नुकतेच लडाखमध्ये चीनने नवा भूभाग घशात घातला, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे नाव घेण्याचे किंवा ‘आमच्या सीमेत कोणीही घुसले नाही’ या पलीकडे जाऊन ठामपणे बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत. राहुल गांधी म्हणतात ते अगदी खरे आहे की, पंतप्रधान सध्या ‘कॉम्प्रमाईज्ड’ (दबावाखाली) आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडींच्या दबावामुळे भारत सरकार झुकले आहे.”
न्यूझीलंडचे दूध आयात झाले तर अमूल संपेल
व्यापार धोरणे आणि सामान्य शेतकरी-व्यापाऱ्यांच्या समस्या मांडताना त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. “मी सध्या आनंद-अमूलच्या परिसरात बसून बोलत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करारांच्या दबावाखाली जर भारताने न्यूझीलंडचे दूध आयात करायला सुरुवात केली, तर आपल्या देशातील दुग्ध व्यवसाय आणि अमूलसारखी संस्था पूर्णपणे संपून जाईल आणि स्थानिक शेतकरी देशोधडीला लागेल.”
यूपीआयवर कर लावण्याचा घाट
“छोट्या उद्योगांना संरक्षण देण्याऐवजी आता डिजिटल व्यवहारांवर म्हणजेच यूपीआयवर (UPI) कर लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास लघुउद्योग बंद पडतील, लोक पुन्हा कॅशच्या व्यवहाराकडे वळतील आणि देशात पुन्हा ब्लॅक इकॉनॉमी (काळा पैसा) फोफावेल. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ‘विकसित भारत’ कधीही साकार होऊ शकत नाही,” असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटी लगावला.
————————————————————
हेही वाचा…
विधान परिषद निकालावरून विजय वडेट्टीवारांचा घणाघात: म्हणाले- भाजपचे दिवस भरलेत, मोदींचे जाणं अन् राहुल गांधींचं येणं निश्चित

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी (३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ) झालेल्या निवडणुकीचे निकाल आणि कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “भाजपचे दिवस आता भरले असून, त्यांचा जायचा वेळ आला आहे,” असा घणाघाती हल्ला वडेट्टीवार यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी