![]()
“विधान परिषद निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेवर युतीधर्म न पाळल्याचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, त्यावर आमचा अत्यंत तीव्र आक्षेप आहे. महायुतीची ताकद ही तिन्ही पक्ष एकत्र राहण्यातच आहे, कोणत्याही एका पक्षाच्या जोरावर सत्ता टिकू शकत नाही. निवडणुकीत पराभव झाला की मित्रपक्षाला दोष देण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर सतत हल्ले करून किंवा त्यांना कमकुवत करण्याचा छुपा प्रयत्न झाला, तर त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाला होईल आणि महायुती रसातळाला जाईल,” असा थेट इशारा शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी भाजपच्या नेतृत्वाला दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालानंतर भाजपमधील नेत्यांनी शिवसेनेवर असहकार्याचे आरोप सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या ‘एकला चलो’ भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आणि समन्वय समितीच्या बैठकीत आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. पराभवाचे खापर शिवसेनेवर का? भाजपकडून होणाऱ्या जाहीर टीकेचा समाचार घेताना संजय निरूपम म्हणाले, “विधानपरिषदेच्या निकालांनंतर शिवसेनेवर युतीधर्माचे पालन न केल्याचा आरोप केला जात आहे. सार्वजनिक व्यासपीठावर येऊन मित्रपक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे भाजपला शोभत नाही. अशा प्रकारची बेताल वक्तव्ये तत्काळ थांबली पाहिजेत.” फ्रेंडली फाईटचा विसर पडला का? “यापूर्वी नगरपरिषद किंवा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्येही संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती (फ्रेंडली फाईट) झाल्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये आमचाही पराभव झाला, पण आम्ही कधीही भाजपवर पराभवाचे खापर फोडले नाही किंवा उघड आरोप केले नाहीत. या निवडणुकीतही एका जागेवर दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनेच निर्णय झाला होता.” मी स्वतः नागपूरचा प्रभारी होतो, पण एकदाही साधी चर्चा झाली नाही! नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून सुरू असलेल्या वादावर निरुपम यांनी भाजपला आरसा दाखवला. “नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेने सहकार्य केले नाही, अशी आवई उठवली जात आहे. प्रत्यक्षात मी स्वतः शिवसेनेकडून नागपूरचा प्रभारी होतो. मात्र, संपूर्ण निवडणुकीच्या काळात भाजपच्या स्थानिक किंवा वरिष्ठ नेत्यांनी एकदाही माझ्याशी संवाद साधला नाही, शिवसेनेला साध्या चर्चेतही सहभागी करून घेतले नाही.” निवडणूक हलक्यात घेतल्याचा फटका “भाजपने ही निवडणूक अतिशय हलक्यात घेतली किंवा त्यांच्या बाजूने समन्वयाचा प्रचंड अभाव होता. स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी मित्रपक्षाला बदनाम करणे हा कोणता युतीधर्म आहे?” एकट्याच्या बळावर जिंकण्याचा अहंकार सोडा भाजपच्या राजकीय भूमिकेवर बोलताना त्यांनी महायुतीच्या अस्तित्वाचा इशारा दिला. “जोपर्यंत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकदिलाने सोबत आहेत, तोपर्यंतच महायुतीची सत्ता आणि ताकद आहे. जसे तिन्ही पक्ष वेगळे लढतील, तशी निवडणुकीची सर्व गणिते पूर्णपणे बिघडतील.” डॉमिनेट करण्याची मानसिकता घातक “स्वतःच्या एकट्याच्या बळावर सर्व निवडणुका जिंकू किंवा मित्रपक्षांवर कुरघोडी (डॉमिनेट) करू, या मानसिकतेवर भाजपने पुनर्विचार करण्याची अत्यंत गरज आहे. आगामी निवडणुका जिंकायच्या असतील, तर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून जागावाटप आणि रणनीती आखली पाहिजे.” हिंदुत्वासाठी शिंदेंनी साथ दिली, त्यांना कमकुवत केल्यास उबाठाच मजबूत होईल! एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देताना निरुपम म्हणाले, “जेव्हा भाजपचे जुने सहकारी त्यांना सोडून गेले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केली.” उबाठाला नामोहरम केले “ज्या उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला होता, त्या उबाठा गटाला विधानपरिषदेच्या या निवडणुकीत मतदारांनी पूर्णपणे धूळ चारली असून त्यांचे कुठेही नामोनिशाण उरलेले नाही.” शिंदेसेनेला लक्ष्य करणे महायुतीसाठी आत्मघातकी “एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा किंवा शिंदेसेनेला कमकुवत करण्याचा कोणताही छुपा अजेंडा जर राबवला गेला, तर महायुती आतून पोखरली जाईल आणि त्याचा थेट फायदा उबाठा गटाला होईल. त्यामुळे प्रसारमाध्यमांत वाद घालण्यापेक्षा महायुतीच्या समन्वय समितीची तात्काळ बैठक बोलवून सर्व गैरसमज दूर करावेत,” असे आवाहन संजय निरुपम यांनी शेवटी केले. ——————————————————————- हेही वाचा… धंगेकरांवर एकनाथ शिंदेंनी तातडीने कारवाई करावी: त्यांनी केसाने गळा कापला, मित्रपक्षाच्या हव्यासापोटी पुणे पदवीधर सीट गमावली- नवनाथ बन मित्रपक्षाच्या एका जागेच्या हव्यासापोटी आमचा उमेदवार पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाला. तर छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चव्हाण यांना शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी विरोध करत त्यांच्या विरोधात काम केले. पुण्यात तर रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना जाहीर पणे आवाहन केले की भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका. धंगेकर यांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल तर एकनाथ शिंदेंनी धंगेकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शिक्षक मतदारसंघापूरते आम्ही समजू शकतो पण पदवीधरमध्ये उमेदवार नसताना भाजपचे काम केले नाही, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
शिंदेसेनेला कमकुवत करण्याचा छुपा प्रयत्न थांबवा!:संजय निरूपमांचा पलटवार, म्हणाले- पराभवाचे खापर आमच्यावर फोडणाऱ्या भाजपच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप