![]()
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण आणि पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुषार हंबीरला अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. तो आठ महिन्यांपासून फरार होता. तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गर्दी, मारामारी आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत. ३ मार्च २०२६ रोजी दुपारी पुरंदर तालुक्यातील कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी व्यावसायिकाने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचे कापूरहोळ येथे मद्यविक्रीचे दुकान आणि उपाहारगृह आहे. व्यावसायिकाचा मुलगा उपाहारगृहातून दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याचे अपहरण केले. माहिती मिळताच व्यावसायिकाने पोलिसांना कळवले आणि शिरवळपर्यंत मोटारीचा पाठलाग केला. पोलिसांनी तपास सुरू केला. अपहरणकर्त्यांनी पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी येथे मुलाला सोडल्याचे समजले. मुलाने पोलिसांना सांगितले की, मोटारीतील आरोपींनी त्याला धमकावले. एकाने पिस्तुलाचा धाक दाखवला, तर दुसऱ्याने कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली. समोरून पोलिसांचे वाहन येत असल्याने आरोपींनी मोटार शेतात नेली आणि त्याला रस्त्याकडेला सोडले. पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला. आरोपींची मोटार रस्त्याच्या कडेला उलटली. आरोपी मोटार तिथेच सोडून पळून गेले, अशी माहिती मुलाने दिली. तपासात अपहरण तुषार हंबीर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे समोर आले. पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली. त्यानंतर टोळीचा म्होरक्या हंबीर फरार झाला होता. तो हडपसरमधील फुरसुंगी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून हंबीरला पकडले. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक युवराज धोंडे आणि पोलीस कर्मचारी रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील आणि भारत मोहळ या पथकात होते.
Source link
व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करणारा तुषार हंबीर अटकेत:पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई; आठ महिन्यांपासून फरार होता