![]()
अमरावतीतील गोपालनगर आणि महावीरनगर परिसरातील नाले तुंबले आहेत. नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या, मात्र त्यावर वेळेत कारवाई होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. परिसरातील अनेक मुख्य आणि अंतर्गत नाल्यांमध्ये कचरा साचला आहे. नाले उघडे असून त्यावर सिमेंटचे स्लॅब किंवा जाळ्या नाहीत. त्यामुळे घरांमधून आणि दुकानांमधून निघणारा कचरा नाल्यांत टाकला जातो. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्य आणि सांडपाण्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाल्यांतील पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. डासांची संख्या वाढल्याने संध्याकाळी घराबाहेर पडणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि टायफाईडचा धोका असल्याचेही नागरिकांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात नियमित नालेसफाई होत नाही. पावसाळा किंवा उन्हाळ्यात धूर फवारणी आणि जंतुनाशकांची फवारणीही झालेली नाही. प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून आश्वासनेच मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर शहरातील स्वच्छतेची जबाबदारी आहे. मात्र, स्वच्छता मोहिमांचे दावे कागदोपत्रीच असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
Source link
अमरावतीत गोपालनगर, महावीरनगरचे नाले तुंबले:नागरिकांच्या तक्रारींकडे मनपाचे दुर्लक्ष; कचरा, दुर्गंधी आणि डासांमुळे आजारांचा धोका