![]()
अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी चांदूरबाजार येथील भाजप कार्यालयात जनता दरबार घेतला. विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या. तायडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना आपल्या अडचणी थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडता याव्यात आणि प्रलंबित कामांना गती मिळावी, या उद्देशाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागांशी संबंधित तक्रारी आणि प्रश्न नागरिकांनी मांडले. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांच्या समस्या वेळेत सुटाव्यात, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन तायडे यांनी केले. जनता दरबारात शेतीपर्यंत जाणारे रस्ते, घरकुल योजनेतील अडचणी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठता यादीतून वगळलेली नावे, रब्बी हंगामातील पीक नियोजन आणि वीज वितरण कंपनीशी संबंधित तक्रारींवर चर्चा झाली. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तायडे यांनी गावोगावी शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून आवश्यक उपाययोजनांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जनता दरबारात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे, तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे, शिरजगाव मंडळ अध्यक्ष हर्षल धुळे, आमदारांचे पीए अंकुश शिर्लोस्कर, प्रतीक भुसारी आणि तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कमी उत्पन्न असूनही आयकर विवरणपत्र भरत असलेल्या काही नागरिकांची रेशन कार्डे रद्द झाली आहेत. या नागरिकांनीही जनता दरबारात आपली अडचण मांडली. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार योगेश गाडे यांच्यासोबत पाणी नियोजनाबाबत चर्चा झाली. शिराळा वीज वितरण उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या वडूरा येथील शेतकऱ्यांनीही तक्रारी मांडल्या. गावातील कोंडे डीपी आणि काकडे डीपीवर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने पिकांना पाणी देण्यात अडचण येत असल्याचे शेतकरी सत्यजित ठाकरे यांनी सांगितले. तायडे यांनी याची दखल घेत शिराळा उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता कोकाटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
Source link
आमदार तायडे यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकल्या:चांदूरबाजारमध्ये विद्यार्थी, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश