![]()
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असतानाच भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. कामानिमित्त वरणगाव परिसरात आलेल्या 23 वर्षीय डंपर चालकाला अज्ञात हल्लेखोराने रस्त्यात अडवून त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वरणगाव शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरफराज सय्यद असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुक्ताईनगर शहरातील काजीपुरा परिसरातील रहिवासी असून एका कंपनीत डंपर चालक म्हणून काम करतो. कामाच्या निमित्ताने तो वरणगाव परिसरात आला होता. याचदरम्यान त्याला रस्त्यात अडवण्यात आले. त्यानंतर हल्लेखोराने त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली. गोळीबारात सरफराज गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. सरफराज आणि हल्लेखोर यांच्यात पूर्वीपासून काही वाद होता का, वैयक्तिक कारणातून हा हल्ला झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीचा शोध लागल्यानंतर आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच या हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अमळनेरमध्ये जुन्या वादातून डंपरने चिरडून हत्या दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथेही जुन्या वादातून डंपरचा वापर करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शरद रतन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपींनी डंपरने त्यांना चिरडल्याने त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी आणि भरत सुभाष पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील डंपर जप्त केला असून, डंपर चालकाला अटक केली आहे. इतर आरोपींच्या भूमिकेबाबतही तपास केला जात आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही दाखल या हत्येच्या घटनेला जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्याने आरोपी आणि मृत शरद पाटील यांच्यात वाद निर्माण झाला होता, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या तीन दिवस आधीच आरोपींनी शरद पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. यासंदर्भात त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केल्यामुळेच हा हल्ला करण्यात आला का, धमकी आणि हत्येच्या घटनेचा एकमेकांशी संबंध आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, वरणगावमधील गोळीबार आणि अमळनेरमधील डंपरने चिरडून केलेली हत्या या दोन्ही घटनांमुळे जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला तरुणावर गोळीबार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, तर दुसरीकडे जुन्या वादातून एका व्यक्तीचा जीव घेण्यात आला. या घटनांमुळे जिल्ह्यात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हेही वाचा…. मुंबईत रस्ते, रेल्वे आणि बेस्टचा प्रवासही असुरक्षित:कांदिवलीत रस्त्यावर ऑइल सांडल्याने 30 मिनिटांत 14 दुचाकी घसरल्या, अनेक जखमी मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कधी लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागतो, तर कधी बेस्ट बसच्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. भरधाव वाहनांमुळे रस्त्यांवर होणारे अपघातही सातत्याने घडत असताना आता रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात रस्त्यावर ऑइल सांडल्याने अवघ्या 30 मिनिटांत तब्बल 14 दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली. या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी घसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सविस्तर वाचा….
Source link
वरणगावमध्ये 23 वर्षीय डंपर चालकावर बेछूट गोळीबार:कामानिमित्त आलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून झाडल्या गोळ्या, प्रकृती चिंताजनक