Headlines

कोजागिरीपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमे- पर्यंत दत्त दिंडीची महिनाभर अखंड परंपरा:तरुणाईसह चिमुकल्यांचा वाढता सहभाग, शेंदुरजना घाटची पहाट दत्त गजराने भक्तिमय



शहरात वर्षानुवर्षे सुरू असलेली पहाटेची दत्त दिंडी यंदाही कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून अखंडपणे सुरू झाली आहे. २६ ऑक्टोबरपासून पहाटे ५ वाजता सुरू झालेल्या या दिंडीमुळे शहरातील दिवसाची सुरुवात दत्तनामाच्या गजराने होत आहे.

.

कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच २४ नोव्हेंबरपर्यंत ही दिंडी सलग ३० दिवस सुरू राहणार आहे. पहाटेच्या मंगलमय वातावरणात वीणा, टाळ आणि मृदंगाच्या निनादासह दत्तनामाचा तसेच विठ्ठलनामाचा गजर केला जातो. त्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण भक्तिमय बनते. दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिला रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत करतात. तसेच मार्गावरील मंदिरांमध्ये दिंडीची पूजा करून वारकऱ्यांचे स्वागत केले जाते. पूर्वी या दिंडीमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून येत असे. त्यांच्या गळ्यात टाळ, वीणा आणि मृदंग पाहायला मिळत होते. कालांतराने ही परंपरा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, आता तरुणाईसह चिमुकलेही मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी होत आहेत. पारंपरिक वारकरी वेशभूषेत गळ्यात टाळ-मृदंग घेऊन सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या दिंडीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन होत आहे.

कार्तिक पौर्णिमेला दिंडीची सांगता कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढून महिनाभर चालणाऱ्या या दिंडीची सांगता केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *