Headlines

बांगलादेश, श्रीलंकेचा दाखला देत विरोधकांवर वार:देशामध्ये अराजक माजवून सत्तांतराचा कट- फडणवीस




विरोधकांची आंदोलने आणि संविधानावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना थेट उत्तर देण्यासाठी महायुतीने सोमवारी मुंबईत ‘लोकतंत्र बचाव – अराजकता हटाव’ पदयात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून ताकद दाखवली. दादरच्या सेनापती बापट पुतळ्यापासून प्रभादेवीच्या कामगार मैदानापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या हेतूवर थेट बोट ठेवले. “आंदोलनांच्या नावाखाली देशात ‘रेजिम चेंज’ घडवून आणण्याचा कट शिजत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील राजकीय उलथापालथींचा दाखला देत, “भारतात निवडून आलेले सरकार आणि व्यवस्था पाडण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत; शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करू,” असा इशारा त्यांनी दिला. या वेळी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांकडून खोटा प्रचार : रवींद्र चव्हाण या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली, “विरोधक खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करत आहेत; संविधानाचा गैरवापर करून देशात गोंधळ माजवण्याचा त्यांचा हा डाव लोकच हाणून पाडतील.” केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही “हा देश बांगलादेश नाही; इथे बाबासाहेबांचे संविधान चालते, नुसती आंदोलने करून सत्ता बदलता येत नाही,” असा टोला लगावला. राहुल गांधींच्या प्रचाराला थेट रस्त्यावर उतरून चोख उत्तर देत महायुतीने मुंबईत राजकीय रणशिंग फुंकले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *