![]()
पैठण शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या संतपीठाच्या विकासाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संचलित पैठण येथील संतपीठात भव्य कीर्तन हॉल आणि अद्ययावत ग्रंथालय इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने १५ कोटी ६४ लाख ४५ हजार ७७९ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या वैभवात आणि सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. संतपीठासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्य शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या तांत्रिक सहमतीनंतर हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर या महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने संतपीठाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. संतपीठाच्या प्रस्तावित कीर्तन हॉलची इमारत १ हजार ८०० चौरस मीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रफळावर उभारण्यात येणार असून, या इमारतीसाठी सुमारे ६ कोटी ४६ लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. ग्रंथालयाचे क्षेत्रफळ ४१६.५२ चौरस मीटर असून, त्यासाठी सुमारे १ कोटी १६ लाख ६२ हजार खर्च अपेक्षित धरला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, बाह्य विद्युतीकरणाची कामेही करण्यात येणार बांधकामासोबतच संतपीठ परिसरात पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत, अंतर्गत सिमेंट रस्ते, वाहन पार्किंग शेड, संपूर्ण परिसर विकास आणि आकर्षक उद्याननिर्मिती अशी विविध कामे देखील मार्गी लावली जाणार आहेत. संतपीठातील शैक्षणिक आणि अभ्यासू वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी स्वतंत्र ग्रंथालयाची सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच नवीन कीर्तन हॉलमुळे कीर्तन, प्रवचन, संत साहित्याचा अभ्यास, वारकरी परंपरा आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक भव्य आणि स्वतंत्र जागा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केला.
Source link
पैठण येथील संतपीठात कीर्तन हॉल अन् ग्रंथालय; 15.64 कोटींचा निधी:उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २ नोव्हेंबरला काढले आदेश