![]()
उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, किणी टोलनाक्यावर नेते राजू शेट्टी यांनी गेल्या २१ तासांपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत ऊसदराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली असून, आता मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूधही रोखण्याचा मोठा इशारा त्यांनी दिला आहे. ‘एक कांडसुद्धा ऊस कारखान्याला पुरवायचा नाही’ राजू शेट्टी म्हणाले, आजपासून कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी एक कांडसुद्धा ऊस कारखान्याला पुरवायचा नाही. शेतातला ऊस शेतातच राहू द्या आणि गावातून उसाची वाहतूकही होऊन देऊ नका. या कारखानदारांना जरा लाज वाटली पाहिजे.” एमएसपी (MSP) वाढवण्याच्या समितीच्या दौऱ्याला मुकले शेट्टी यांनी साखरेच्या किमान हमीभावाचा (MSP) मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, “गेली सात वर्षे केंद्र सरकार साखरेची एमएसपी वाढवत नव्हते. आम्ही अथक प्रयत्न करून तज्ज्ञांची समिती स्थापन करायला लावली. आज या समितीचा पुण्यात दौरा होता आणि तिथे मी पूर्ण ताकदीने एमएसपी का वाढवली पाहिजे, हे मांडण्यासाठी जाणार होतो. मात्र, या दळभद्री कारखानदारांमुळे मला इथे रस्त्यावर बसावे लागले. शेतकऱ्यांची बाजू समितीसमोर गेली नाही, तर त्याला पूर्णपणे कारखानदार जबाबदार असतील, कारण सात वर्षांत त्यांना काहीच जमलेले नाही. ‘शेतकरी बेदखल, मग दूध-भाजीपाला कशाला पाहिजे?’ राजू शेट्टी म्हणाले, आम्ही इथे २१ तास झाले रस्त्यावर बसलो आहोत. सरकारचा प्रतिनिधी तर सोडा, पण गावातला साधा तलाठीसुद्धा आमची साधी चौकशी करायला आलेला नाही. जर तुम्ही शेतकऱ्यांना एवढे बेदखल करणार असाल, शेतकरी तुमच्या खिजगणतीतच नसेल, तर मग तुम्हाला शेतकऱ्याचे दूध कशाला पाहिजे? शेतकऱ्याचा भाजीपाला कशाला पाहिजे?” राजू शेट्टी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. सरकारने वेळीच तोडगा न काढल्यास मुंबई आणि मोठ्या शहरांकडे जाणारा दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा रोखण्यात येईल, असा थेट इशाराच राजू शेट्टी यांनी दिल्यामुळे आता राज्य सरकार आणि प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ———————- हेही वाचा.. देशाचा पहिला समुद्री रेल्वे बोगदा…:नवी मुंबईमध्ये 4 मजली इमारतीएवढी उंच टनेल बोअरिंग मशीन 4 आरपीएमच्या वेगाने समुद्राकडे सरकत आहे
३५ मजली इमारत जितकी उंच असते, तितकाच जमिनीखाली सावली (नवी मुंबई) येथे बुलेट ट्रेनच्या बोगद्याचा ‘शाफ्ट’ आहे. सकाळचे ९ वाजले आहेत. दिव्य मराठीची टीम जमिनीपासून ११४ मीटर खोलीवर याच शाफ्टच्या टोकावर उपस्थित आहे. खूप जास्त उकाडा व गुदमरल्यासारखे होत असूनही १,२०० लोक पहिल्या समुद्री रेल्वे बोगद्याला आकार देत आहेत. याच बोगद्यातून पहिली बुलेट ट्रेन धावेल. सविस्तर वाचा
Source link