![]()
अप्पर वर्धा धरणाची पाणीपातळी गेल्या काही दिवसांपासून दररोज कमी होत चालली आहे. परिणामी धरणाच्या ‘बॅकवॉटर’लासुद्धा धक्का लागला आहे. ती पातळीसुद्धा कमी होत आहे. अशा स्थितीत कालव्याद्वारे सोडले जाणारे पाणी बंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मोर्शी-वरुडचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांना साकडे घातले आहे. शेतकरी प्रतिनिधीमंडळाच्या मते अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस अत्यंत कमी पडला. परिणामी धरणातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या धरणात फक्त ४० टक्के पाणी शिल्लक आहे. त्याचवेळी ‘बॅकवॉटर’देखील संपुष्टात येण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. लोणी, भापकी, पळसवाडा, बेलोरा, इत्तमगाव, अलोडा, शिंगोरी, ममदापूर, हातुर्णा या गावांतील शेती याच बॅकवॉटरवर केली जाते. याच भागातील शेतकऱ्यांची जमीनही मोठ्या प्रमाणात अप्पर वर्धा धरणासाठी संपादित केलेली आहे. त्यामुळे पाणी मिळण्याचा पहिला अधिकार या परिसरातील शेतकऱ्यांचा आहे. कालव्याद्वारे पाणी सोडत राहिल्यास बॅकवॉटरही संपुष्टात येईल. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडले जाऊ नये, अशी संबंधितांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मते त्यांच्या शेतात संत्रा, मोसंबी व इतर पिके आहेत. भविष्यात पाणी न मिळाल्यास ही पिके नष्ट होतील. शिवाय जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी शिल्लक राहणार नाही. या गंभीर पार्श्वभूमीवर कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी तुषार निकम, प्रवीण मानकर, अजय काचरे, चंद्रशेखर पावडे, अशोक ताथोडे, स्वप्नील खांडेकर, सतीश चौधरी, राजेंद्र ताथोडे, अरुण पावडे, मधुकर मनोटे, कैलास वानखडे, राजेंद्र शहाणे, विलास सोनारे, निकेश ताथोडे, धनराज चौधरी, मंथन पावडे, सतीश ताथोडे, जगदीश पाटणे, गणेश उईके, राजेश पावडे, शुभम पावडे, आशिष पावडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या सर्वदूर पाण्याची टंचाई असल्यामुळे सर्वत्र अतिरिक्त पाण्याची मागणी होत आहे. अशा स्थितीत मिळत असलेले पाणी थांबवा, अशी मागणी पुढे आल्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. त्यामुळे कालव्याद्वारे सोडले जाणारे पाणी थांबवले जाते की कायम ठेवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
धरणाची पातळी कमी होत असल्याने ‘बॅक वॉटर’ला धक्का:चिंता वाढली, कालव्याचे पाणी बंद करा, वरुडच्या शेतकऱ्यांची मागणी