![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उजनी धरण परिसरात प्रस्तावित डेटा सेंटरला विरोध करत आंदोलन केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांना विकासकामांचा फोबिया झाला आहे का, असा सवाल उपस्थित करत जिथे जिथे विकासकामे सुरू होतात, तिथे ते प्रसिद्धीसाठी आंदोलन करताना दिसतात, असा आरोप गोरेंनी केला. तसेच कोणत्याही आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आपले आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सल्ला घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. उजनी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या डेटा सेंटरच्या प्रकल्पाला रोहित पवार यांनी विरोध दर्शवला होता. या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलन करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. या आंदोलनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. विकासकामांना विरोध करून केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली. ‘रोहित पवार स्वकर्तृत्वावर नाही, तर पवारांच्या पुण्याईवर नेते झाले’ रोहित पवार यांच्या राजकीय वाटचालीवरही जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला. रोहित पवार हे स्वतःच्या कर्तृत्वावर नव्हे, तर पवार कुटुंबाच्या पुण्याईवर नेते झाले आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीही विकासाला विरोध केला नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी विकासकामांविरोधात आंदोलन करण्यापूर्वी किमान आपल्या आजोबांशी चर्चा करावी आणि त्यांचा सल्ला घ्यावा, असे गोरे म्हणाले. दरम्यान, या राजकीय टीकेसोबतच जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसाठीच्या पाणी नियोजनाबाबतही महत्त्वाची माहिती दिली. उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना एक पाणी पाळी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रब्बी हंगामासाठी डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. याबाबत माहिती देताना जयकुमार गोरे म्हणाले की, रब्बी हंगामासाठी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणातून एक पाणी पाळी सोडण्यात येईल. यासंदर्भात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असला तरी ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. या आरक्षणानंतर उपलब्ध राहणाऱ्या पाण्याचे शेतीसाठी नियोजन केले जाणार आहे. उन्हाळी हंगामात पाणी पाळी सोडण्याबाबतचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन घेतला जाईल, असेही गोरे यांनी स्पष्ट केले. रब्बी पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याच्या आधारावर पेरणी केली आहे. मात्र, पावसाअभावी पिकांसमोर पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा वेळी उजनी धरणातून एक पाणी पाळी मिळाल्यास ज्वारी, गहू आणि इतर रब्बी पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबतही जयकुमार गोरे यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 5 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वितरण सुरू झाले आहे. बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही, तर त्यांच्या अडचणी समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही गोरे यांनी सांगितले. एकीकडे उजनी धरण परिसरातील डेटा सेंटरच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि सत्ताधारी भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे, तर दुसरीकडे उजनीच्या पाण्याच्या नियोजनावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. त्यामुळे आगामी काळात डेटा सेंटरच्या प्रकल्पावरून राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून रब्बी हंगामासाठी जाहीर केलेल्या पाणी पाळीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे. हेही वाचा…. ‘संविधानाशी खेळाल तर हात भाजल्याशिवाय राहणार नाहीत’:राहुल गांधींना देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा, म्हणाले- ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ या घोषवाक्याखाली आयोजित महा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात लोकशाही आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांविरोधात वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘राहुल गांधी, संविधानाशी खेळाल तर तुमचे हात भाजल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा थेट इशाराही फडणवीस यांनी दिला. ही लढाई भाजप, एनडीए किंवा नरेंद्र मोदी यांच्यासाठी नसून देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा….
Source link
रोहित पवारांना विकासकामांचा फोबिया झालाय का? जयकुमार गोरेंचा सवाल:म्हणाले, आंदोलन करण्याआधी आजोबांचा सल्ला घ्या