![]()
एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला. कळंब तालुक्यातील बोर्डा येथे ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून अभिजित नवाद या तरुणाने घरात घुसून तरुणीच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. बहिणीवर कोयत्याने वार केले. जातिवाचक शिवीगाळ करत एका २३ वर्षीय तरुणीला वाहनातून जबरदस्तीने नेले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले. आरोपीने तरुणीच्या मानेवर कोयता ठेवून तब्बल ४० मिनिटे पोलिसांना हुलकावणी दिली.अखेर पोलिसांनी चातुर्याने तरुणीची आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. कळंब तालुक्यातील बोर्डा येथील एका २३ वर्षीय तरुणीवर एका युवकाचे एकतर्फी प्रेम असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. पोलिसांनी वाहन अडवल्यानंतर आरोपीने तरुणीच्या मानेवर धारदार कोयता रोखला. ‘कोणीपुढे आले तर एकतर या मुलीला संपवतो, नाही तर स्वतःला संपवतो,’ अशी धमकी देत आरोपीने पोलिसांसमोर थरारक परिस्थिती निर्माण केली. तब्बल ४० मिनिटे हा थरार सुरू होता.अखेर पोलिसांनी संयम दाखवला. चातुर्य दाखवले. तरुणीची सुखरूप सुटका केली. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलिसांनी कार अडवून आरोपीला रोखले. आरोपीने पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर बनली. तरुणीची सुटका करण्यासाठी पोलिसांना सावधगिरीने परिस्थिती हाताळावी लागली. पोलिसांनी चातुर्याने तरुणीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आरोपी कारमधून बोर्डा येथील तरुणीच्या घरी पोहोचला. त्याने तरुणीच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तिच्या बहिणीवर कोयत्याने वार केले. कोयत्याचा धाक दाखवण्यात आला. जीवे मारण्याची धमकी देत तरुणीला जबरदस्तीने वाहनात बसवले. तिला बोर्डा येथून दगडवाडी शिवारातील खडी केंद्रापर्यंत नेण्यात आले. याप्रकरणी अभिजित ऊर्फ तन्या अर्जुन नवाद (२४, रा.कोठाळवाडी), किरण भागवत तुपारे (रा. बोरगाव, ता. कळंब), अजय रामकिसन माने (रा. परळी रोड बायपास, कळंब) व अन्य एका व्यक्तीविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार करीत आहेत.
Source link
एकतर्फी प्रेमातून थरार:तरुणीचे अपहरण; बहिणीवर कोयत्याने वार, आईला मारहाण, कळंब तालुक्यातील बोर्डा येथील घटना