![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड महायुतीच्या बाजूने होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चावर टीका करताना, “आम्ही विरोधी पक्षात आहोत. लोकांनी आम्हाला विरोधी पक्षाचा मॅन्डेट दिला आहे. मग त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आमच्या 12 संचालकांनी उपस्थित का राहायचे?” असा सवाल त्यांनी केला. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. यावेळी त्यांनी गोकुळच्या निवडणुकीपासून अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंतच्या घडामोडींवर भाष्य केले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ‘कोरम मान्य नव्हता तर न्यायालयात जाऊन 13 चा करून आणायचा होता’ गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 13, तर महायुतीचे 12 संचालक निवडून आले होते. नियमानुसार 50 टक्के अधिक एक म्हणजे 14 सदस्य उपस्थित असल्याशिवाय सभेचा कोरम पूर्ण होणार नव्हता. याच मुद्द्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतल्याचे मुश्रीफ म्हणाले. ते म्हणाले, “मी यापूर्वीही गोकुळच्या निवडणुकीबाबत आणि अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अनेकदा माझे मत मांडले आहे. महाविकास आघाडीचे 13 आणि महायुतीचे 12 संचालक निवडून आले होते. 14 सदस्यांशिवाय कोरम पूर्ण होणार नव्हता. हा कोरमच तुम्हाला मान्य नव्हता, तर न्यायालयात जाऊन कोरम 13 चा करून आणायचा होता. आम्ही तुम्हाला कुठे अडवले होते? तुम्ही अध्यक्ष निवड करा, त्यांची मिरवणूक काढा आणि कारभार हातात घ्या. जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिले होते. मात्र, आता आग्रह असा आहे की आमच्या 12 संचालकांनी हजर राहावे. तेही तुमचा अध्यक्ष करण्यासाठी. मग आमच्या संचालकांनी तुमचा अध्यक्ष करण्यासाठी उपस्थित का राहायचे?” विजयाचा उन्माद दाखवला, नेत्यांचा अपमान केला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजय मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने राजकीय वक्तव्ये केली, त्यावरही मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “एकदा विरोधी पक्षाचा मॅन्डेट मिळाल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडली. यावेळी समन्वयाची भाषा केली जाणार नाही, असे आंबेडकर साहेबांनीही म्हटले होते. निवडणूक जिंकल्यानंतर जणू काही आपण जगाचे राजे झालो आहोत, अशा आविर्भावात अनेक दिवस विजयाचा उन्माद दाखवण्यात आला. 10 आमदार, तीन खासदार, तीन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांबद्दलही अपमानजनक भाषा वापरण्यात आली. हीच गोष्ट आम्हाला खटकली.” ‘मोर्चा गोकुळसाठी नव्हे, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी होता’ महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चावर टीका करताना मुश्रीफ यांनी या मोर्चाचा गोकुळशी संबंध नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांनीही यासंदर्भात चांगली पत्रकार परिषद घेतली होती. वैधानिक अडचण दूर करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तुम्ही एकत्र येऊन निवड करणार असाल तर शासनाची काही अडचण नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, तसा प्रस्ताव देण्याची दानत किंवा हिंमत विरोधकांनी दाखवली नाही. उलट मोठा मोर्चा काढून आम्हाला शिव्याशाप देण्यात आले.” पुढे ते म्हणाले, “मला वाटते, आजची सभा ही गोकुळसाठी नव्हतीच. काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हटवून प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी ही सभा होती. गोकुळ हा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आहे. त्याचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. मग राज्यभरातील नेत्यांचा या विषयाशी काय संबंध? सांगली, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागांतून नेते आणि कार्यकर्ते आणण्यात आले. स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली.” न्यायालयाच्या निर्णयामुळे महायुतीचा मार्ग मोकळा न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना मुश्रीफ म्हणाले की, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने चार सदस्यांच्या मतदानाबाबत स्वतंत्र मतपेटी ठेवण्याची सूचना मान्य केली आहे. मात्र, सर्व 29 मतांची एकत्रित मोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. ते म्हणाले, “न्यायालयाने कोल्हापूरमधील डिव्हिजन बेंचसमोर सुरू असलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक घेण्यास सांगितले आहे. चार सदस्यांची मते स्वतंत्र पेटीत ठेवली जातील. मात्र, 29 मतांची एकत्रित मोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या चार सदस्यांची नावे आम्हालाही अद्याप माहिती नाहीत.” शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे समर्थन करताना ते म्हणाले, “एका संस्थेसाठी हा अध्यादेश काढण्यात आल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. मात्र, पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या अनेक संस्थांमध्ये शासनाची जमीन, शासनाचे पैसे, अनुदान आणि कर्ज गुंतलेले असते. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने अध्यादेश काढला आहे.” उद्या महायुतीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा निर्णय गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून कोणाचे नाव निश्चित झाले आहे, असा प्रश्न विचारला असता मुश्रीफ यांनी उद्या सकाळी बैठक होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “उद्या सकाळी आमची बैठक होईल. त्या बैठकीत एकमताने महायुतीचा अध्यक्ष निवडला जाईल. अध्यक्षपदाचे नावही उद्याच जाहीर होईल. साडेपाच लाख दूध उत्पादकांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. आमच्या कारकिर्दीत चांगला कारभार होईल, असा मला विश्वास आहे.” राजू शेट्टींच्या वक्तव्यावर म्हणाले, पोलिस नोंद घेतील महाविकास आघाडीच्या मोर्चात राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत चार शासननियुक्त सदस्य मतदानासाठी आले, तर ते परत जाताना खांद्यावरून जातील, अशा आशयाचे वक्तव्य केल्याबाबत मुश्रीफ यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “त्या वक्तव्याची नोंद पोलिस घेतील. शासनाने नियुक्त केलेल्या सदस्यांना कोणत्या पद्धतीने अडवले जाते, याचीही पोलिस नोंद घेतील. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.” चार सदस्यांना मतदानाचा अधिकार; सात दिवसांच्या नोटिशीचा मुद्दाही निकाली शासननियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार का, तसेच सहकार कायद्यानुसार सात दिवसांची नोटीस देण्याची अट कशी पूर्ण होणार, याबाबतही मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “अध्यादेशामध्येच उपविधीतील दोन्ही अटी रद्द करण्यात आल्या आहेत. कोरम आणि सात दिवसांची नोटीस या दोन्ही अटींमधील अडचणी दूर करण्यासाठी हा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत या सदस्यांच्या मतदानाचा अधिकाराचा प्रश्न स्पष्ट झाला आहे.” मोर्चानंतर महायुतीकडूनही शक्तिप्रदर्शनाची शक्यता महाविकास आघाडीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि दूध उत्पादकांना घेऊन मोर्चा काढल्यानंतर उद्या होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे मुश्रीफ यांनी सांगितले. ते म्हणाले, “महाविकास आघाडीने मोर्चा काढला आणि त्यानंतर न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने आला. आता अंतिम अध्यक्षपदाची निवड आमच्या बाजूने होणार असल्याने कार्यकर्ते जल्लोषासाठी उपस्थित राहतील. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.” दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. उद्या सकाळच्या बैठकीत अध्यक्षपदाचा फॉर्म्युला निश्चित होणार असून त्यानंतर नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गोकुळवर प्रशासक आणणे हे सरकारचे सूडबुद्धीचेच राजकारण:कोल्हापुरात संघर्ष मोर्चातून सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल गोकुळ दूध संघावरील शासनाच्या हस्तक्षेपाविरोधात आणि ५ अतिरिक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात आज कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या ‘संघर्ष मोर्चा’त काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जातीवादाचा आणि घराणेशाहीचा आरोप करत थेट हल्लाबोल केला. तसेच, महायुती सरकारने गोकुळमध्ये सूडबुद्धीने प्रशासक आणल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा….
Source link
गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार:विरोधकांच्या मोर्चाला हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला त्यांचा चेअरमन करण्यासाठी हजर राहण्याची गरज काय?