Headlines

पूर्णा प्रकल्पाच्या पाइपलाइनमधून पाणी शेतात शिरले:बोरजमधील शेतात सहा दिवस पाणी साचले; तूर पिकाचे नुकसान, भरपाईची मागणी




अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील बोरज येथील शेतकरी राजस यांच्या शेतात पूर्णा प्रकल्पाच्या पाइपलाइनमधून गळती होऊन पाणी शिरले. त्यामुळे तूर पिकाचे नुकसान झाले. शेतात सहा दिवस पाणी साचून राहिले. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा वेळी पाण्याचा जपून वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, पाइपलाइनमधून गळती होऊन पाणी शेतात साचले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती नसल्याचेही समोर आले. पूर्णा प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. गळतीमुळे तूर पिकासह जमिनीचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतात पाणी साचल्याने तूर पिकाचे नुकसान झाले. संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. शेतकरी आशा राजस यांनी सांगितले की, त्या गेल्या बुधवारी पूर्णा प्रकल्पाच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. दिवसभर थांबूनही तक्रार स्वीकारण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिली. तहसील कार्यालयातही तक्रार करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *