![]()
सामाजिक दायित्वातून श्री रेणुका माता मित्र मंडळाने मातोश्री वृद्धाश्रमात आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी केली. केशकर्तनासह वृद्धांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर त्यांना नवीन कपडे भेट देऊन श्रीखंडपोळीचे जेवणही देण्यात आले.
.
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाशाची उधळण असते. मात्र ज्यांचे आभाळ हरवले आहे त्यांना दिवाळी काय? अन् दसरा काय? सर्व दिवस सारखेच. ही बाब लक्षात घेऊन कुटुंबापासून दूर असलेल्या आणि खऱ्या अर्थाने एकमेकांना आधार देत उरलेले आयुष्य जगणाऱ्या शिवापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत श्री रेणुका माता मित्र मंडळाने दिवाळी साजरी केली. त्यामुळे चेहऱ्यावर हास्य फुलले. केशकर्तनासह अभ्यंगस्नान, श्रीखंडपोळी, काजूकतली, मोतीचूरचे लाडू, काळाजामून, आईस्क्रीम, तसेच अन्य मिठाई, आजोबांना नवीन कपडे, आजींना पातळ, साडी मिळाल्याने आजी-आजोबांचे डोळे पाणावले. काही जण कुटुंबाला त्रास नको म्हणून स्वतःच वृद्धाश्रमात येतात. काही जण वादविवाद टाळण्यासाठीही तिथे येतात. यामुळे आजी-आजोबांची दिवाळी साजरी करण्यासाठी हा उपक्रम श्री रेणुका माता मित्र मंडळातर्फे राबवला जातो. उपक्रमाचे हे २८ वे वर्ष होते.
असा पार पडला सोहळा : प्रथम सकाळी ७ वाजता आजोबांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर औक्षण करून सुगंधी उटण्याने स्नान घालण्यात आले. आजोबांना नवीन कपडे देण्यात आले. पातळ नेसणाऱ्या आजींना पातळ, साडी, गाऊन देण्यात आले. आजोबांना पँट, सदरा, बाम, खोबरेल तेल, पावडर, दंतमंजन, स्नानाचा साबण, कपडे धुण्याचा साबण, आरसा, कंगवा, गुडघेदुखीचे मलम, डेटॉल, अंडरवेअर, बंडी, चपला दिल्या. त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी रोख रक्कमही देण्यात आली. हे साहित्य व धान्य देण्यासाठी महापौर शारदा खेडकर, माजी महापौर रफीक सिद्दीकी, आयुक्त डॉ. सुनील लहाने, डॉ. गजानन नारे, रेडक्रॉस सोसायटी, माजी उपायुक्त विजय पारतवार, संदीप गावंडे, नरेश बावणे, शैलेश चोपडे, सोनल मोरे, किरण तांबट (रा.पुणे), स्व. श्रीराम गावंडे स्मृतिप्रीत्यर्थ नमन गावंडे, स्व. दामोदरपंत निंबेकर स्मृतिप्रीत्यर्थ दिलीप निंबेकर, स्व. रघुनाथ पांडे स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. राम पांडे, स्व. अरुण जोगळेकर स्मृतिप्रीत्यर्थ अनघा जोगळेकर, शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड, मनपाचे पीआरओ भरत शर्मा, संजय चव्हाण, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता मनोज बोंडे आदी उपस्थित होते.
तिसरी पिढीही सज्ज सामाजिक उपक्रमांसाठी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोगळेकर हे कुटुंबासह पुढाकार घेतात. दिवाळी उपक्रमात पत्नी श्रद्धा, मुलगा मंदार, सून हर्षा सहभागी झाले. आता त्यांचा नातू चिरायुही सहभागी झाला. जोगळेकर यांनी अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्गाचेही आयोजन केले.