![]()
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने बुटीबोरी परिसरात १४३ किलो २८३ ग्रॅम डोडा पावडर जप्त केली. या पावडरची किंमत २८ लाख ६५ हजार ५२० रुपये आहे. वाहनांसह एकूण ३९ लाख २५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, राजस्थानमधील तिघांना अटक केली आहे. १० नोव्हेंबरला अंमली पदार्थविरोधी पथक आणि बुटीबोरी पोलिसांचे पथक वर्धा-बुटीबोरी मार्गावर गस्त घालत होते. हळदगाव बसथांब्याजवळ त्यांना महिंद्रा बोलेरो वाहन संशयास्पद वाटले. वाहनचालक महेंद्र झुमरराम खडावा (२५, रा. पाली, राजस्थान) याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो १२३ ग्रॅम डोडा पावडर आढळली. पोलिसांनी पावडर, सुमारे १० लाख रुपये किमतीची बोलेरो आणि मोबाइल जप्त केला. बुटीबोरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), १५ (ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करून महेंद्रला अटक केली. तपासात महेंद्रच्या मोबाइलमधील व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटच्या आधारे पोलिसांना पुरवठादाराचा धागा मिळाला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील चौधरी राजस्थानी ढाब्याचा मालक पप्पू चौधरी याच्याकडून डोडा पावडर खरेदी केल्याचे समोर आले. ११ नोव्हेंबरला पोलिसांनी ढाब्यावर छापा टाकला. तेथे १४२ किलो १५१ ग्रॅम डोडा पावडर आढळली. ढाबामालक पप्पू मोडाराम चौधरी (३५) आणि त्याचा सहकारी हडमनराम चिमाणराम सारण (३०), दोघेही राजस्थानचे रहिवासी, यांना अटक केली. पोलिसांनी डोडा पावडरीसह मोबाइल, मिक्सर मशीन, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि रोख रक्कम जप्त केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पुरवठा साखळीतील अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Source link
बुटीबोरीत 143 किलो डोडा पावडर जप्त:राजस्थानमधून पुरवठा; अंमली पदार्थाची किंमत 28.65 लाख रुपये, तिघांना अटक