Headlines

पालकमंत्र्यांनी आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली:निमकुंडमध्ये पाणी योजनेसाठी 3.44 कोटी, विकासकामांसाठी 50 लाख देण्याची घोषणा




अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या निमकुंड गावात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. गावासाठी पाणी योजनेला ३ कोटी ४४ लाख रुपये आणि विकासकामांसाठी ५० लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचा शुभारंभही बावनकुळे यांनी केला. सप्ताहात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. गावात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यासाठी आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. गावातील सध्याची पाणीपुरवठा योजना अपुरी असल्याने नव्या योजनेला मंजुरी देण्यात येईल. गावातील इतर विकासकामांसाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला जाईल, असे बावनकुळे म्हणाले. त्यांनी गावकऱ्यांना घरगुती वापराच्या वस्तूंचे वाटप केले. विविध सरकारी योजनांचे लाभही त्यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला आमदार प्रवीण पोटे, केवलराम काळे, प्रवीण तायडे, अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने, निमकुंडच्या सरपंच रत्ना नागले, उपसरपंच अनिल अकोले, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला तसेच पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी उपसरपंच अनिल अकोले यांनी स्वागत केले. आमदार केवलराम काळे यांनी प्रास्ताविक केले, तर आमदार प्रवीण पोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सप्ताहाच्या शुभारंभानंतर बावनकुळे गावातील अशोक चिताराम आठवले यांच्या घरी गेले. आठवले कुटुंबीयांनी त्यांना घरगुती फराळ आणि चहा दिला. बावनकुळे यांनी अशोक आठवले यांची आई जसाय, पत्नी सुनीता आणि मुलं अंश व आरोह यांची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *