Headlines

पुण्यात रविवारी राष्ट्रीय डर्ट बाइक रेसिंग स्पर्धा:‘डर्ट ट्रॅक पुणे 2.0 ’मध्ये देशभरातील 150 रायडर्स सहभागी होणार; प्रेक्षकांना मोफत प्रवेश




पुण्यात रविवारी, १५ नोव्हेंबरला ‘डर्ट ट्रॅक पुणे २.०’ ही राष्ट्रीय डर्ट बाइक रेसिंग स्पर्धा होणार आहे. एआयएसएसएमएस कॉलेजच्या मागील मैदानावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्पर्धा होईल. देशभरातील सुमारे १५० रायडर्स यात सहभागी होतील. टीम पुणे रोडीज अ‍ॅडव्हेंचर क्लब आणि एआयएसएसएमएस कॉलेजने संयुक्तपणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. कॉलेजच्या मैदानावर तयार केलेल्या मातीच्या ट्रॅकवर विविध गटांतील शर्यती होतील. एकूण १८ वर्गांत स्पर्धा होणार असून, १५ महिला रायडर्सही सहभागी होतील. स्पर्धेसाठी एकूण साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. महिला रायडर्सना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व महिला स्पर्धकांना मोफत प्रवेश दिला आहे. सर्वाधिक गटांत सहभागी होऊन सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या महिला रायडरला विशेष पारितोषिक दिले जाईल. नवोदित रायडर्ससाठी स्वतंत्र गटही ठेवण्यात आला आहे. पुण्यात मोटारस्पोर्ट्सला चालना देण्यासाठी रोडीज अ‍ॅडव्हेंचर क्लब गेल्या चार वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. २०२२ मध्ये रायडर्सना प्रशिक्षण देणे आणि छोट्या स्पर्धा घेणे, येथून या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला शर्यतींसाठी १० ते १५ रायडर्स येत होते. आता ही संख्या सुमारे १५० झाली आहे. महाराष्ट्रातील सुमारे २०० रायडर्स देशभरातील विविध स्पर्धांत सहभागी होत असून, राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करत आहेत. पुण्यातील तरुण रायडर्सना संधी मिळावी आणि शहराचे नाव मोटारस्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे टीम रोडीजचे अध्यक्ष अमरेंद्र साठे यांनी सांगितले. महिला रायडर्सना प्रोत्साहन देण्यावरही आयोजकांनी भर दिला आहे. प्रशिक्षण घेतलेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील शर्यतीत कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, असे आयोजकांनी सांगितले. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश आहे. रायडर्सना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *